CoronaVirus: घरेच्या घरे कोरोनाग्रस्त! पुढे काय होईल सांगता येत नाही; नितीन गडकरींचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 06:23 PM2021-04-15T18:23:30+5:302021-04-15T18:24:31+5:30
Nitin Gadkari on Corona Virus second Wave: नागपुरमध्ये आज राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (National Cancer Institute) १०० बेडच्या कोरोना हॉस्पिटलचे अनावरण केले. या अनावरण कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
राज्यासह देशभरात कोरोनाची मोठी लाट आली आहे. तिला थोपविण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊन, निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोना लसीचा तुटवडा, रेमडेसीवीरचा तुटवड्याबरोबरच रुग्णांना आता हॉस्पिटल आणि बेडही अपुरे पडू लागले आहेत. अशी एकप्रकारची युद्धसदृष्य परिस्थीती उद्भवली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोना आपत्ती घोषित करण्याची मागणी करणारे पत्र पाठविले आहे. या साऱ्या पार्शभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. (Union Minister Nitin Gadkari inaugurated a 100 bedded #COVID19 care hospital at National Cancer Institute - NCI, Nagpur)
नागपुरमध्ये आज राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (National Cancer Institute) १०० बेडच्या कोरोना हॉस्पिटलचे अनावरण केले. यावेळी ते बोलत होते. कोरोनामुळे घरेच्या घरे बाधित झाली आहेत. पुढे काय होील हे सांगणे उचित नाही. हे कोरोना संकट किती काळ चालेल आणि किती मोठे रुप घेईल हे काहीच सांगता येत नाहीय. यामुळे या पुढच्या १५ दिवसांत किंवा महिनाभरात काय होईल हे सांगता येणार नाही. यामुळे चांगल्याचा विचार करणे आणि वाईटाचा मुकाबला करण्यासाठी तयारी करणे गरजेचे आहे. हॉस्पिटलनी युद्धपातळीवर काही काम केले तर पुढे मागे काही घडले, घडू नये. परंतू त्यासाठी तयार रहायला हवे, असे गडकरी म्हणाले.
या अनावरण कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये ही बेडची संख्या २०० पर्यंत लवकरच वाढविण्यात येणार आहे. ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यासाठी गडकरी प्रयत्न करत आहेत. पुढील ४-५ दिवसांत नागपुरातील ऑक्सिजन आणि बेडची परिस्थिती सुधारेल. गरज असलेल्यांनाच बेड आणि रेमडेसीवीर इंजेक्शन मिळावे, असे फडणवीस म्हणाले.