coronavirus : वाढत्या कोरोनाबधितांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण इस्लामपूर सील, जयंत पाटील यांच्या प्रशासनाला कडक सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 02:28 PM2020-03-28T14:28:05+5:302020-03-28T14:29:08+5:30

जीवनावश्यक वस्तूसाठी घरातील एकाच व्यक्तीला बाहेर सोडणार, संकट मोठं आहे त्याला एकजुटीने परतावून लावू, जयंत पाटील यांना विश्वास

coronavirus: Jayant Patil's strongly advised to administration on the rising corona patients in Islampur BKP | coronavirus : वाढत्या कोरोनाबधितांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण इस्लामपूर सील, जयंत पाटील यांच्या प्रशासनाला कडक सूचना

coronavirus : वाढत्या कोरोनाबधितांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण इस्लामपूर सील, जयंत पाटील यांच्या प्रशासनाला कडक सूचना

Next

मुंबई -  सांगली जिल्ह्यात १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. सांगली जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा २३ वर पोहोचला आहे. लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन करत असताना संकट मोठं आहे त्याला एकजुटीने आपण परतावून लावू अशी भावनिक साद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जनतेला घातली आहे. ते फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत होते.

आपल्या लाईव्हमध्ये जयंत पाटील म्हणाले की, वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला कडक सुचना दिल्या आहेत. हे सर्व रुग्ण एकट्या इस्लामपूरचे असल्याने संपूर्ण इस्लामपूर हे सील करण्यात आले आहे. ज्या परिसरातील हे रुग्ण आहेत तो परिसर आधीच सील करण्यात आला होता मात्र आता त्या परिसराच्या घरातील एकच व्यक्ती जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर सोडला जाईल. जो व्यक्ती बाहेर पडेल त्याच्या हातावर स्टॅम्प लावला जाईल. ज्या व्यक्तीच्या हातावर स्टॅम्प असेल त्यालाच घराबाहेर सोडले जाईल. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन येत्या काळात आणखी निर्णय घेईल असेही पाटील म्हणाले.

कोरोनाला पराभूत करण्यासाठी घरात राहणं हा एकच मार्ग आहे. राज्यात ६ महिने पुरेल इतका अन्न धान्याचा साठा आहे. लोकांनी बाहेर फिरू नये व २१ दिवसांच्या लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले. पोलिसांवर सध्याच्या काळात मोठी जबाबदारी आहे. आपण त्यांचा, त्यांच्या कार्याचा सन्मान करा. तुम्ही त्यांना सहकार्य केले, घराबाहेर पडले नाही तर ते कठोर वागणार नाहीत असेही ते म्हणाले.

या लाईव्हदरम्यान परदेशातून अनेकांनी जयंत पाटील यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. अनेक जण अजूनही परदेशात अडकले आहेत. सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली आहे त्यामुळे आता जे जिथे आहेत त्यांनी तिथेच सुरक्षित रहावे असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांना वाहतुकीची मूभा दिली आहे. भाजी मंडई येथे लोकांनी गर्दी करू नये. अनेक ठिकाणी चौकोन आखून दिले आहेत. नागरिकांनी त्यातच राहून व्यवहार करावेत. सर्वच घटकांवर याचा फटका बसणार आहे पण लोकांचे कमीतकमी नुकसान होईल याचा प्रयत्न सरकार करेल असं आश्वासनही मंत्री पाटील यांनी दिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात महत्त्वाची बैठक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी सांगलीतील सर्व प्रशासनासह बैठक घेतली आहे. लोकांनी त्यांना सहकार्य करावे आणि घरीच थांबावे. आपल्याला कोणतीही अडचण असेल शासनाशी संपर्क करा असे आवाहन त्यांनी केले. लोकांनी माणुसकी सोडू नये. जीवनावश्यक वस्तूचा काळाबाजार करू नका, काळाबाजार करणाऱ्यांवर सरकार कडक कारवाई करणार असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: coronavirus: Jayant Patil's strongly advised to administration on the rising corona patients in Islampur BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.