Coronavirus : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जेजुरीत भाविकांना दर्शनबंदी ; ३१ मार्चपर्यंत मंदिर राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 08:58 PM2020-03-16T20:58:49+5:302020-03-16T21:04:51+5:30
महाराष्ट्रातील अनेक महत्वाची मंदिरे बंद
जेजुरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार तीर्थक्षेत्र जेजुरीगडावरील तसेच जुना गड कडेपठारावरील दर्शन सोमवारी मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत भाविकांसाठी बंद करण्यात आल्याचा निर्णय मार्तंड देवसंस्थान आणि कडेपठार विश्वस्त मंडळाकडून घेण्यात आला आहे.
या संदर्भात जेजुरीत मार्तंड देवसंस्थानाचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे व पदाधिकारी कडेपठार मंदिर कमिटीचे सचिव सदानंद बारभाई, ग्रामस्थ, मानकरी, पुजारी, सेवेकरी ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे.
या वेळी पालिकेचे विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, देवाचे मानकरी इनामदार राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, खांदेकरी मानकरी मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, सतीश कदम, नित्य वारकरी मंडळाचे कृष्णा कुदळे, बारा बलुतेदार संघटनेचे संतोष खोमणे, माधव बारभाई, अनिल बारभाई, समीर मोरे, रमेश देशपांडे उपस्थित होते.
जगभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. भारतातही प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काही निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सोमवारी सर्वसमावेशक घटकांची एक संयुक्त बैठक घेऊन ३१ मार्चपर्यंत भाविकांना दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या काळात मंदिराची संपूर्ण स्वच्छता, परिसर स्वच्छता त्याचबरोबर भाविक एकवीरा पेस्ट कंट्रोलचे किरण उघाडे यांच्याकडून संपूर्ण उद्यापासून मंदिरात पेस्ट कंट्रोल केले जाणार असल्याची माहिती देवसंस्थानाचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी दिली.
०००