coronavirus: जून-जुलै महिने चिंताजनक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 06:52 AM2020-05-12T06:52:07+5:302020-05-12T06:52:35+5:30
देशभरातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. लॉकडाऊनबाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले
मुंबई : आपण एप्रिलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला; मात्र मे अखेर कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असून जून, जुलैमध्ये हा संसर्ग उच्चांकीपातळीवर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा तसा इशारा दिला आहे. चीनच्या वूहानमध्ये परत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्याचे वाचण्यात आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनबाबत अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागेल, असे सांगत जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
देशभरातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. लॉकडाऊनबाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, देशभरात मजुरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. मात्र मजूर विविध झोन्समधून प्रवास करीत असल्याने प्रत्येक राज्याने व्यवस्थित काळजी आवश्यक आहे. अन्यथा, कोरोनाचा प्रादर्भाव
वाढू शकतो. लॉकडाऊनमुळे राज्याला सुमारे ३५ हजार कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्राने जीएसटीच्या परताव्याची रक्कम आणि केंद्रीय करातील राज्याचा वाटा तातडीने द्यावा, अशी मागणीही ठाकरे यांनी यावेळी केली.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना सुरु होती. मात्र काही जिल्ह्यांमध्ये विशेषत: विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही. आता खरीप हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे त्यांना पीककर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेला सूचना द्याव्यात. सुमारे १० लाख शेतकºयांना त्याचा फायदा होईल, असे ठाकरे यांनी सांगितले. वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी शुल्क माफ करावे. काही संस्था उपकरणे आयात करीत आहेत, त्यांना सीमा शुल्कात सवलत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा सुरू करण्यात यावी. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना विशेष पास देऊन या सेवेचा उपयोग करता येईल, अशी मागणीही ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली.
पोलिसांना विश्रांती हवी; केंद्रीय मनुष्यबळाची गरज
कोरोना महामारीच्या या संकटकाळात डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अहोरात्र काम करीत आहेत.
विशेषत: पोलिसांना विश्रांती देण्याची गरज आहे. ते आजारी पडून चालणार नाही. त्यामुळे आवश्यकता भासेल, तसे केंद्र सरकारने त्यांच्याकडील मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरील ताण कमी होईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.