CoronaVirus फक्त दिवे बंद करा, अन्यथा...; महापारेषणचे कळकळीचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 07:15 AM2020-04-05T07:15:26+5:302020-04-05T07:16:09+5:30
देशातील विजेची मागणी अचानक १२ ते १३ हजार मेगावॅटने कमी होण्याची शक्यता आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील विजेचे दिवे बंद करून दीपप्रज्वलन करण्याचे आवाहन देशातील जनतेला केले आहे. या वेळी केवळ घरातील विजेचे दिवेच ९ मिनिटांसाठी बंद करा. पंखा, फ्रीज, टीव्ही, कॉम्प्युटर्स यांसारखी अन्य उपकरणे सुरू ठेवा. घराचा किंवा गृहनिर्माण सोसायटीचा संपूर्ण वीजपुरवठा बंद करू नका. शहरांतील पदपथांवरील दिवे अखंड सुरू राहतील. हॉस्पिटलसह सर्व अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या आस्थापना, पालिकांची कार्यालये, पोलीस स्टेशन आदी ठिकाणचे दिवे बंद करू नका, असे आवाहन महापारेषणकडून करण्यात आले आहे.
हे करताना देशातील विजेची मागणी अचानक १२ ते १३ हजार मेगावॅटने कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पॉवर ग्रीडमध्ये बिघाड होऊन देश अंधारात बुडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, ती निरर्थक असून नॅशनल लोड डिस्पॅच सेंटरने ग्रीड नियंत्रणासाठी आवश्यक ती कार्यप्रणाली निश्चित केली आहे. त्यानुसार राज्या-राज्यातील लोड डिस्पॅच सेंटर्सला सूचना दिल्याचे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
लोकांनी घरातील विजेची सर्व उपकरणे बंद केल्यास विजेचा वापर अपेक्षेपेक्षा आणखी कमी होऊन त्या स्थितीत नियोजन बिघडू शकते. त्यामुळे केवळ घरांतील दिवेच बंद करावेत, असे आवाहन केले जात आहे.
ही काळजी घ्या
सॅनिटायझरमध्ये काही प्रमाणात ज्वालाग्राही अल्कोहोल असते. त्यामुळे रविवारी रात्री मेणबत्ती किंवा दिवा पेटविताना हाताला सॅनिटायझर लावलेले नाही याची खात्री करा. दिवे लावण्यापूर्वी शक्यतो हात साबणाने धुतलेले असतील किंवा सॅनिटायझर अल्कोहोलमुक्त असेल
याची खबरदारी घ्या.