coronavirus: विचारशक्तीचा अभाव, मरणाची भीती अन् गावाची ओढ!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 05:41 AM2020-05-16T05:41:21+5:302020-05-16T05:41:44+5:30
कोविड-१९ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडून मार्चमध्ये लॉकडाऊन लागू केल्यापासून इतर राज्यात काम करणाऱ्या मजुरांचे गावांकडे जाण्याची धडपड सुरू झाली.
- असिफ कुरणे
कोल्हापूर : कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर प्रमुख महामार्गावर मजुरांचे जथ्येच्या जथ्ये दिसू लागले. ५० दिवसानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. या स्थलांतरामागे मरणाची भीती, विचारशक्तीचा अभाव आणि सोशल मीडियावरून मिळणारी चुकीची माहिती अशी विविध कारणे असल्याचे मानसशास्त्रांनी स्पष्ट केले. मजुरांसह अनेकांचे सुरू असलेले स्थलांतर आता चिंताजनक बनत आहे.
कोविड-१९ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडून मार्चमध्ये लॉकडाऊन लागू केल्यापासून इतर राज्यात काम करणाऱ्या मजुरांचे गावांकडे जाण्याची धडपड सुरू झाली. या स्थलांतरामागे बंद पडलेले उद्योग, रोजगाराचा अभाव आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न ही कारणे वरवर दिसत असली, तरी यामागे मानसशास्त्रीय कारणे आहेत. त्याचा महत्त्वाचा प्रभाव स्थलांतरामागे असल्याचे मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत यांनी म्हटले आहे. गरीब लोक हजार ते १५०० किलोमीटर अंतर लहान मुलांसोबत कसे कापायचे. आपण तेथेपर्यंत पोहोचू की नाही, याचा विचार न करता चालत घराबाहेर पडले आहेत. याचा मोठा परिणाम आगामी काळात जाणवणार आहे.
अशाप्रकारे महास्थलांतर झाल्यामुळे येत्या काही महिन्यात शहरातील सामाजिक, आर्थिक घडामोडींवर विपरित परिणाम होणार असून मानवी श्रमाची किंमत कळेल. तसेच कमी झालेली सहसंवेदनेचा फटका देखील बसेल. तसेच श्रीमंत व उच्च मध्यमवर्गीय लोकांना या समस्येचा जास्त सामना करावा लागू शकतो अशी भीती यांनी व्यक्त केली.
१० कोटी प्रवासी मजूर
२०१६ च्या आर्थिक सर्व्हेनुसार
१० कोटींपेक्षा जास्त लोक
देशात प्रवासी मजूर असल्याचा अंदाज आहे.
आंतरराज्य मजुरांचा अधिकृत आकडा नसला तरी ६.५ कोटींपर्यंत त्यांची संख्या असल्याचे मानले जाते.
त्यात उत्तर प्रदेश (२५), बिहार (१४), राजस्थान (६), मध्य प्रदेश (५) या राज्यांचा वाटा जास्त आहे.
म्हणजे ४० ते ६० लाख उत्तर प्रदेशात, २० ते ३० लाख लोक बिहार, १० लाख राजस्थान तर ९ लाख लोक मध्य प्रदेशात जावू इच्छितात किंवा वाटेवर आहेत.
कोठे आहेत जास्त मजूर
दिल्ली, मुंबई, गुरूग्राम, नोएडा, बेंगळुरू, सुरत, पुणे, थिरुवरुलू, चेन्नई, कांचीपूरम, इंदोर, भोपाळसोबत औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, पंजाब, तेलंगणा, तमिळनाडूमधील ग्रामीण भागातून जास्त मजूर गावी परतू लागले आहेत.