CoronaVirus : केवळ काही दिवसांत देशातले सर्वांत मोठे ‘कोरोना हॉस्पिटल’ सज्ज!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 01:56 AM2020-03-28T01:56:23+5:302020-03-28T05:42:13+5:30
CoronaVirus : अत्यंत बिकट अशा नैसर्गिक आपत्तींशी झुंजताना उल्लेखनीय कार्य केल्यानंतर आता केवळ काही दिवसांत तयार केलेल्या या हॉस्पिटलमुळे ओदिशा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
- समीर मराठे
नाशिक : संपूर्ण जग कोरोना व्हायरस आणि आपापल्या आरोग्य व्यवस्थेशी झुंजत असताना भारतातील ओदिशा या राज्यानेही त्यासाठी आपली कंबर कसली असून देशातले सर्वात मोठे आणि एक हजार खाटांचे पहिले ‘कोरोना हॉस्पिटल’ तयार केले आहे. अत्यंत बिकट अशा नैसर्गिक आपत्तींशी झुंजताना उल्लेखनीय कार्य केल्यानंतर आता केवळ काही दिवसांत तयार केलेल्या या हॉस्पिटलमुळे ओदिशा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
हे ‘कोरोना हॉस्पिटल’ तयार असून येत्या आठ-दहा दिवसांत कोरोना
पेशंट्सच्या वापरासाठी ते संपूर्णपणे सज्ज असेल अशी व्यवस्था ओदिशा प्रशासन, तसेच तिथल्या गृह आणि आरोग्य खात्याने करून ठेवली आहे. यासंदर्भात ओदिशातील प्रशासकीय अधिकारी शामलकुमार दास यांनी सांगितले, भुवनेश्वर येथील ‘सम’ (शिक्षा ओ अनुसंधान) आणि ‘किम’ (कलिंगा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस) या वैद्यकीय महाविद्यालयांच्या हॉस्पिटलचे रुपांतर तातडीने ‘कोरोना हॉस्पिटल’मध्ये करण्यात आले आहे. अत्यावश्यक ती सारी साधनसामुग्री
तिथे बसवण्यात आली असून कोरोनासंदर्भातील सर्व आधुनिक उपचार येथे होऊ शकतील.
मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या पुढाकारानंतर त्वरित पावले उचलण्यात आली आणि दोन त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आले. त्यानुसार हे हॉस्पिटल आकाराला आले. ते आणखी सुसज्ज करण्यासाठी इतरही राज्यांनी मदत करावी असे आवाहनही मुख्यमंत्री पटनाईक यांनी केले
आहे. वारंवार येणारी चक्रीवादळे,
पूर, भूकंप. यासारख्या नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त असलेले ओदिशा राज्य
देशातील ‘मागास’ राज्य समजले जात
असले तरी आपत्ती व्यवस्थापनाच्या
बाबतीत मात्र या राज्याचा देशात
पहिला क्रमांक लागतो. आपत्ती व्यवस्थापनातील देशातील सर्वोत्तम यंत्रणा ओदिशाकडे आहे.
ओदिशामध्ये नुकत्याच आलेल्या फोनी चक्रीवादळात ओदिशा प्रशासनाने किनारपट्टीवरील १४ जिल्ह्यातील तब्बल १५ लाख नागरिकांना केवळ २४ तासाच्या आत सुरक्षित जागी हलवले होते.
हा एक विक्रम मानला जातो आणि त्याबद्दल जगातील विकसित देशांनी, अगदी संयुक्त राष्टÑसंघानेही ओदिशाची पाठ थोपटली होती. आताही ‘कोरोना’च्या साथीतून वाचण्यासाठी पहिले पाऊल उचलताना ओदिशाने देशातले सर्वात मोठे ‘कोरोना हॉस्पिटल’ केवळ काही दिवसांत सज्ज केले आहे.
एक हजार खाटा तयार
- भुवनेश्वर येथील ‘सम’ रुग्णालयात ५०० खाटा आणि ‘आयसीयू’ची व्यवस्था
- किम’ रुग्णालयात ४५० खाटा आणि इतर व्यवस्था
- गरजेनुसार त्यात वाढही करता येईल.
सीएसआर निधीतून व्यवस्था
- ‘ओदिशा मायनिंग कॉर्पोरेशन’ (ओएमसी)
आणि ‘महानदी कोलफिल्ड लिमिटेड’ (एमसीएल) यांनी निधी पुरवला