coronavirus: लासलगावचा कांदा पोहोचला बांगलादेशात! मध्य रेल्वेच्या तीन मालगाड्या रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 06:51 AM2020-05-11T06:51:56+5:302020-05-11T06:52:24+5:30
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून बांग्लादेशात कांदा निर्यात केला आहे. लासलगाव येथून एक मालगाडी ६ मे रोजी निघाली. तर, कांद्याचा दुसरा व तिसरा रेक खेरवाडी व निफाड येथून बांगलादेशातील दरसाना येथे पाठविला गेला.
मुंबई : मध्य रेल्वेची जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक देशभरात सुरु आहे. मात्र आता बाहेरील देशातदेखील वाहतूक केली जात आहे. राज्यातील कांदा मध्य रेल्वेद्वारे बांगलादेशात पाठविण्यात आला आहे. कांद्याने भरलेल्या तीन मालगाड्या बांगलादेशात पाठवले आहे. तर, लॉकडाऊन काळात मध्य रेल्वेने देशभरात जीवनावश्यक सामग्रीचे ५.५ मेट्रिक टन वाहतूक केली आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून बांग्लादेशात कांदा निर्यात केला आहे. लासलगाव येथून एक मालगाडी ६ मे रोजी निघाली. तर, कांद्याचा दुसरा व तिसरा रेक खेरवाडी व निफाड येथून बांगलादेशातील दरसाना येथे पाठविला गेला. लासलगाव ते बांगलादेशातील दरसाना येथे आणखी ६ मालगाड्या पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
हा कांदा निर्यात करण्यासाठी वाणिज्य आणि आॅपरेटिंग विभागांकडून संभाव्य लोडर्ससह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेण्यात आल्या. यामुळे बांगलादेशातील डारसाणा, बेनापोल आणि रोहनपूर स्थानकांत कांद्याची निर्यात सुरू झाली. भुसावळ विभागातून भारतीय रेल्वेवरील फूटुहा, डानकुनी, चांगसारी, मालदा टाऊन, चितपूर इत्यादी विविध स्थानकांवर पाठविण्यासाठी कांदा लोड केला.
मध्य रेल्वेने मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लॉकडाऊन कालावधीत अन्नधान्य, वीज निर्मितीसाठी कोळसा आणि इतर वस्तू यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या १ लाख ७ हजार ६९८ वॅगन लोड करून मध्य रेल्वेद्वारे त्याची वाहतूक केली. अत्यावश्यक सेवेत काम करणाºया कर्मचा-यांनी दररोज २ हजार १९२ रॅकमध्ये हे लोड केल्याने देशभरात ५.५ मेट्रिक टन वाहतूक करणे शक्य झाले आहे. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून भार भरण्याऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळहून गेला माल
मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागात ३९ हजार ८९२ वॅगनमध्ये कंटेनर, ४६ हजार ४७१ वॅगनमध्ये कोळसा, ५०५ वॅगनमध्ये धान्य, ६२६ वॅगनमध्ये साखर, ९ हजार ३५५ वॅगन्समध्ये पेट्रोलियम उत्पादने, ३ हजार ७७० वॅगनमध्ये खते, १ हजार २१३ वॅगनमध्ये स्टील, ३३६ वॅगनमध्ये डी-आॅइल केक आणि १ हजार ६१३ वॅगनमध्ये सिमेंट व ३ हजार ७९२ वॅगनमध्ये विविध वस्तू भरल्या गेल्या.