Coronavirus Live updates: नांदेड, बीडमध्ये लॉकडाऊन तर परभणीत संचारबंदी; मराठवाड्यात कडक उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 03:56 AM2021-03-25T03:56:46+5:302021-03-25T03:57:19+5:30
कोरोना साखळी तोडण्याचे आव्हान
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने फैलावत असून मराठवाड्यात रुग्णसंख्या कमालीची वाढली आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत प्रशासनाने कठोर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मराठवाड्यातील नांदेड, बीड आणि परभणी या जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. औरंगाबादमध्ये अंशत: संचारबंदी असून शनिवार आणि रविवारी मात्र कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
नांदेडात २५ मार्चपासून लॉकडाऊन
नांदेड जिल्ह्यात दररोज साधारणत: हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळत असून सरासरी दहा जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात २५ मार्च ते ४ एप्रिल यादरम्यान लॉकडाऊन लावण्यात आला आहे. याआधी दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर ही वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आली होती. मात्र आता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने किराणा दुकाने दुपारी १२ वाजेपर्यंतच उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. इतर सर्व व्यवहार मात्र बंदच राहणार आहेत.
बीड जिल्ह्यात १० दिवस लॉकडाऊन
बीड जिल्ह्यात २५ मार्चच्या रात्री बारा वाजेपासून ते ४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात संपूर्णपणे लॉकडाऊन असेल. या काळात शासकीय कार्यालये वगळता इतर सर्व खासगी कार्यालये बंद राहतील. बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी किंवा येण्यासाठी अँटिजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर बंधनकारक असेल, अशा सूचना जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जारी केल्या आहेत.
या दहा दिवसात जिल्ह्यातील क्रीडा संकुल, जिम, स्विमिंग पूल, उपाहारगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद राहतील. शाळा महाविद्यालय, प्रशिक्षण संस्था, शिकवण्या बंद असतील. सार्वजनिक, खासगी वाहने, दुचाकी, चारचाकी वाहने बंद असतील. सर्व प्रकारची बांधकामे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद राहतील. मंगल कार्यालय, हॉल, स्वागत समारंभ, सर्व धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थनास्थळ, खासगी कार्यालये बंद असतील.
परभणी जिल्ह्यात १ एप्रिलपर्यंत संचारबंदी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परभणी जिल्ह्यातही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यात १ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. बुधवारी सायंकाळी ७ वाजेपासून संचारबंदी सुरू झाली असून, १ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदीचा अंमल राहणार आहे. संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवांना सूट दिली असून, या सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.
मराठवाड्यातील स्थिती
नांदेड - २५ मार्च ते ४ एप्रिल कडक लॉकडाऊन
बीड - २६ मार्च ते ४ एप्रिल कडक लॉकडाऊन
परभणी - २४ मार्च ते १ एप्रिल संचारबंदी, अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद.
औरंगाबाद - रात्रीची संचारबंदी रात्री ८ ते सकाळी ६, शनिवार व रविवार कडकडीत बंद
लातूर - रात्रीची संचारबंदी रात्री ८ ते पहाटे ५
जालना - सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत बाजारपेठ खुली ठेवण्यास परवानगी.
उस्मानाबाद - रात्रीची संचारबंदी सायंकाळी ७ ते पहाटे ५. प्रत्येक रविवारी जनता कर्फ्यू
हिंगोली - रात्रीची संचारबंदी सायंकाळी ७ ते पहाटे ५