coronavirus : नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जाचे हप्ते भरण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 08:42 AM2020-03-29T08:42:34+5:302020-03-29T08:43:42+5:30
खाजगी डॉक्टर्स , नर्सेस , सफाई कामगार व पोलिसांना विमा सरंक्षण कवच देणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांना आश्वासन...
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी तीन महिने रेशनकार्ड वर धान्य मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे .मात्र राज्यात अनेक मजूर , गरीब नागरिकांकडे रेशनकार्ड उपलब्ध नाही त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून सर्व गरीब गरजूंना तीन महिने मोफत धान्य उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव यांच्याकडे केली .
आज आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली . केंद्र सरकारने शासकीय रूग्णालयांमधील वैद्यकिय अधिका-यांना व नर्सेसना विमा संरक्षण कवच जाहीर केले असले तरीही खाजगी रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी, नर्सेस व सफाई कर्मचा-यांना तसेच कंत्राटी तत्वावर स्वच्छतेची कामे करणा-या घटकांना, पोलिसांना यांनाही हे कवच मिळण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात राज्य सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी या चर्चेदरम्यान केली.
शेतकऱ्यांनी सहकारी बँका , क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी , पतसंस्था या माध्यमातून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्याची मुदत 30 जून पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी सुद्धा या चर्चे दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
केंद्र सरकारने पथकर नाक्यावर पथकर वसुली बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुद्धा त्यांच्या अखत्यारीतील टोल नाक्यांवर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पथकरातून सूट देण्याची मागणी आ . मुनगंटीवार यांनी केली. कोरोना च्या विरोधातील या लढ्यात आपण राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे ते मुख्यमंत्र्यांना म्हणाले.
वरील सर्वच मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात येईल व शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिले. आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.