CoronaVirus Lockdown News: ३१ मेनंतर लॉकडाऊन वाढणार? मुख्यमंत्र्यांनी एकाच वाक्यात दिले स्पष्ट संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 12:55 PM2021-05-23T12:55:41+5:302021-05-23T12:57:02+5:30
CoronaVirus Lockdown News: राज्यातील लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्र्यांचं महत्त्वपूर्ण विधान; एका वाक्यात दिले महत्त्वाचे संकेत
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. एप्रिल महिन्यात राज्यात दररोज ७० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा ३० हजारांच्या खाली आला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे ३१ मेनंतर लॉकडाऊन संपणार का, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. लहान मुलांसाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय सूचक विधान केलं आहे.
१ जूननंतर राज्यातील लॉकडाऊन वाढणार का?; आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या मोठ्या शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत लक्षणीय घटली आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे या शहरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ग्रामीण भागांत कोरोनानं हातपाय पसरले आहेत. त्यामुळे राज्यात लागू असलेला लॉकडाऊन कायम राहणार की रद्द केला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं. कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे, असं अत्यंत सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली, लॉकडाऊन राहणार की हटणार? राज्यांचा मूड काय सांगतो? जाणून घ्या...
पुढील काही महिन्यांत देशात कोरोनाची तिसरी लाट येईल आणि त्याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारनं बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्समधील डॉक्टरांशी आज मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. 'लहान मुलांच्या पालकांनी काळजी करू नये. लहान मुलांची काळजी घेण्यास सरकार समर्थ आहे. त्यादृष्टीनं प्रशासनाची तयारी सुरू आहे. पालकांनी मुलांना घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध देऊ नये. त्यांच्यावर अनावश्यक भडिमार करू नये,' असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
डॉक्टरांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी कोरोना लसीकरणाबद्दलही महत्त्वाची माहिती दिली. लसींचा साठा कमी असल्यानं सध्या नाईलाजास्तव १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. लसींची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची क्षमता जूनपासून वाढेल. त्यानंतर लसींचा साठा उपलब्ध होईल अशी आशा आहे. १२ कोटी डोस एकरकमी खरेदी करण्याची सरकारची तयारी आहे. प्रत्येकाचं लसीकरण करण्यात येईल. त्यापासून कोणीही वंचित राहणार नाही. कोरोना लसींचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर अहोरात्र लसीकरण मोहिम राबवण्यात येईल. २४ तास लसीकरण सुरू राहील, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.