Coronavirus Lockdown: लॉकडाऊन? नको रे बाबा! त्यापेक्षा नियम पाळू; गरिबांच्या पोटावर पाय कशाला देता?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 02:00 AM2021-03-28T02:00:28+5:302021-03-28T06:09:06+5:30
मिशन बिगिन अगेनमुळे सुरू झालेले दैनंदिन अर्थव्यवहार कोरोनाविषयात नियमांचे पालन करून कोणत्याही परिस्थितीत न थांबविता सुरू ठेवावेत, अशी मागणी विविध स्तरातून व्यक्त होत आहे. पूर्ण लॉकडाऊन केल्यास त्याचा थेट फटका हा हातावर पोट असलेल्या गरिबांना सर्वाधिक बसतो. त्यामुळे निर्बधांची कडक अंमलबजावणी करून कोरोना आटोक्यात आणावा, असा सूर लोकमतच्या पाहणीत दिसला.
लॉकडाऊन अजून जाहीर झालेला नाही, पण तो होईल या भीतीनेच अनेकांना आता कापरे भरले आहे. मागचा अनुभव गाठीशी असल्याने लॉकडाऊन नको त्यापेक्षा नियम पाळू, अशी पक्की मानसिकता पुणेकराची आहे. मागीलवर्षी मार्चच्या याच काळात लॉकडाऊन जाहीर झाला. तोही थेट २१ दिवसांचा. उद्योजकांपासून ते हातावरचे पोट असलेल्या गरीब कष्टकऱ्यापर्यंत सर्वांनाच झळा बसल्या. आता कोरोना रुग्ण वाढल्यावर पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाल्याने लोकांच्या पोटात गोळा आला आहे.
नियम पाळणार नाहीत त्यांना दंड करा
पुण्यात ६ हजार लहान-मोठी रेस्टॉरंट आहेत. किमान ५ कर्मचारी धरले तरी ३ लाख गरीब कर्मचारी या लॉकडाऊनने बेरोजगार होतील. कर्जाचे ओझे घेऊन आम्ही कसातरी व्यवसाय करतो आहोत, तर पुन्हा बंद नको. आम्ही नियम पाळतोच, इतरांनी ते पाळायला हवे. - गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँन्ड हॉटेलिअर्स असोसिएशन.
लॉकडाऊन हा उपाय नाही हे कधीतरी प्रशासनाच्या लक्षात यायला हवे. उद्योग बंद करायचे म्हणजे त्याचा परिणाम थेट अर्थकारणावर होतो. लॉकडाऊन केला तर कोरोना पळून जाणार आहे का?, याचे उत्तर नाही असताना कशासाठी हा प्रयत्न केला जात आहे. त्यापेक्षा कडक निर्बंध लागू करा. ते पुरेसे होईल. - सुधीर मेहता, अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड अँग्रीकल्चर इंडस्ट्री
आर्थिक गाडा विस्कटू नये
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. राज्यातील इतर काही जिल्ह्यातील परिस्थितीही बिघडत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन तर लागू होणार नाही ना, अशी भीती सगळ्यांच्याच मनात आहे. मागचा अनुभव लक्षात घेता कडक लॉकडाऊन नकोच, अशी एकूणच भूमिका व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची आहे.
कोरोना नियंत्रणात यावा, असे सर्वांनाच वाटते. त्यासाठी लोकांना शिस्त लावा, सर्व यंत्रणा कामाला लावा, आणखी कडक उपाय करा, पण पुन्हा कडक लॉकडाऊन नको, असे विविध क्षेत्रातील मान्यवरांचे म्हणणे आहे. नागपुरात गेल्या सात दिवसांचे कडक निर्बंध व आता शिथीलतेसह निर्बंध सुरू असताना कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. यामागे, ‘ट्रेसिंग’ होत नसल्याचे कारण आहे.
लहान व्यापारी आधीच डबघाईस आला. तो पुन्हा उभा राहत आहे. पुन्हा लॉकडाऊन लागला तर व्यापारी पूर्णपणेच संपतील.- प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन.
ट्रिटमेंटवर हवा भर
नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे. यासाठी ट्रेसिंग व ट्रिटमेंटवर अधिक भर देण्याची गरज आहे.- डॉ. नितीन शिंदे, संसर्गजन्य आजार तज्ज्ञ
लॉकडाऊनमध्ये गरीब, मजूर, कष्टकरी लोकांचे मोठे हाल झाले. देशातील १२ कोटी लोकांचा राेजगार गेला. कोट्यवधी लोक देशोधडीला लागले. पुन्हा ती वेळ येऊ देऊ नका.- विलास भोंगाडे, असंघटित क्षेत्रातील कामगारांचे नेते.