CoronaVirus Lockdown News: ‘विकेंड लॉकडाऊन’ला भाजप सहकार्य करणार- फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 02:59 AM2021-04-05T02:59:25+5:302021-04-05T06:53:31+5:30
सरकारने गरीब, मध्यमवर्गीयांचा विचार करून मदतीसाठी पॅकेज दिले पाहिजे
नागपूर : कोरोनाची परिस्थिती महाराष्ट्रात प्रचंड भयावह आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाने शनिवार व रविवारी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला भाजप नेते व कार्यकर्ते सहकार्य करतील. सरकारनेदेखील समाजातील गरीब व मध्यमवर्गीयांचा विचार करुन मदतीसंदर्भात घोषणा केली पाहिजे, अशी भूमिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. नागपुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
राज्यात कोरोनामुळे मृत्यूसंख्या वाढते आहे. यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी सरकारला सहकार्य केले पाहिजे. परंतु सरकारनेदेखील नवीन स्ट्रेनमुळे नेमका संसर्ग वेगाने का पसरतोय याबाबतची कारणे शोधली पाहिजे. मुंबई, पुणे महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे आहेतच, त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे. मात्र मुंबई, पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे, त्याचादेखील विचार व्हावा. आताच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारला आरोग्यसेवा सक्षम बनवावी लागेल, असे मत फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.
सरकारने वीज जोडणी कापणे बंद करावे
राज्य शासनाने सक्तीची कारवाई करून वीज ग्राहकांकडून ४ ते ५ हजार कोटींचा निधी जमविला आहे. आता परत स्थिती खराब होत असल्याने शासनाने वीज जोडणी कापणे बंद केले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
शासनाची अकार्यक्षमता लपविण्यासाठी केंद्राकडे बोट
संजय राऊत आणि आघाडीतील नेते आपली अकार्यक्षमता लपवण्याकरिता केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. केंद्राने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला मदत केली आहे. मी पुराव्यासाहित केंद्र सरकारने काय काय मदत केली हे दाखवले आहे. सरकारने आमच्याकडून मदत मागायची पाठिंबा मागायचा आणि त्यांनी राजकारण करायचं हे योग्य नाही, असेदेखील फडणवीस यांनी स्पष्ट केले.