Coronavirus, Lockdown News: मद्य खरेदीसाठी झुंबड; तळीरामांची दुकानांसमोर लांब रांगा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 02:47 AM2020-05-05T02:47:48+5:302020-05-05T06:55:59+5:30
मराठवाड्यात लातूरमध्ये दारूविक्री सुरू झाली असली तरी औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोलीत ती बंद आहे.
मुंबई : मुंबई-पुण्यासह राज्यात दारू विक्री सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने काढताच दारू खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. सोमवारी दारू दुकाने उघडण्यापूर्वीच मद्यप्रेमींनी दुकानांसमोर लांबच लांब रांगा लावल्या. परिणामी, फिजिकल डिस्टंन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला. राज्यात सर्वत्र हेच चित्र होते. कोल्हापूरमध्ये अनियंत्रित गर्दीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, पोलीस बळाचा वापर करावा लागला व विक्री बंद करावी लागली.
दारू विक्रीसंदर्भात दोन वेगवेगळे आदेश निघाल्याने स्थानिक प्रशासनाचा गोंधळ उडला. एक्साईज विभागाने आपला आदेश मागे घेतल्यानंतर स्पष्टता आली. मात्र, तरीही काही जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी आपल्या पातळीवर दारू विक्री रोखण्याचा निर्णय घेतला. मुंबई उपनगरात दारू विक्रीचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश दुपारी निघाला तर मुंबई शहरासाठीचा आदेश निघता निघता सायंकाळ झाली. त्यामुळे राजधानी मुंबईत बहुतेक ठिकाणी दुकान दारू दुकाने सुरू होऊ शकली नाहीत. ती मंगळवारपासून सुरू होतील. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीत दारू दुकानांचे शटर बंदच राहिले.
पुणे शहरात काही ठिकाणी विक्री सुरू झाली तर पुणे ग्रामीणमध्ये बहुतेक दुकाने उघडली. नाशिक, लातूर जिल्ह्यात दारू विक्रीला जोरदार सुरुवात झाली आणि तेथे मद्यप्रेमींनी एकच गर्दी केली. जळगाव, धुळे, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्'ांमध्ये मात्र मद्यप्रेमींची निराशा झाली. अहमदनगरमध्येही तेच चित्र होते, पण तेथे उद्यापासून दारू मिळणार आहे. पर्यटक जिल्हा असलेल्या रायगडमध्ये पर्यटन बंद असले तरी दारू उद्यापासून मिळेल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये दारूची कवाडे उघडलेली नाहीत. सांगलीमध्ये उद्यापासून विक्री सुरू होणार आहे. मात्र, सातारा जिल्ह्यात ती बंदच राहील.
मराठवाड्यात लातूरमध्ये दारूविक्री सुरू झाली असली तरी औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोलीत ती बंद आहे. उस्मानाबादमध्ये सोमवार, बुधवार, शुक्रवारी दारू मिळेल. तिथे आॅड-इव्हनचा फॉर्म्युला स्वीकारण्यात आला आहे. विदर्भात वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांमध्ये आधीपासूनच दारूबंदी आहे. नागपूर शहरात दारू विक्री सुरू न करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला. मात्र, नागपूर ग्रामीणमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दारू मिळू लागली आहे. भंडारा, गोंदियामध्ये विक्री सुरू झालेली नाही. अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला,बुलढाणा, वाशीम या पाचही जिल्ह्यांत मद्यप्रेमींच्या नशिबी निराशाच आली. तेथे ही दुकाने सुरू न करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.