CoronaVirus Lockdown News: दुकानं बंद, मात्र गर्दी कमी होईना; राज्यातील कठोर निर्बंधाचा पहिला दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 05:32 AM2021-04-07T05:32:48+5:302021-04-07T06:48:54+5:30
दुकाने बंद असतानाही रस्त्यावरील नेहमीची गर्दी कायम होती. शारीरिक अंतराचे बंधन झुगारुन नागरिक बिनधास्त फिरत होते.
मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून सरकारने लागू केलेल्या कठोर निर्बंधांचा पहिल्याच दिवशी राजधानी मुंबईत फज्जा उडाल्याचे चित्र होते. राज्यातील इतर प्रमुख शहरांमधील व्यापाऱ्यांनी बऱ्यापैकी बंद पाळला. परंतु, दुकाने बंद असतानाही रस्त्यावरील नेहमीची गर्दी कायम होती. शारीरिक अंतराचे बंधन झुगारुन नागरिक बिनधास्त फिरत होते.
घड्याळाच्या काट्यावर धावणारी राजधानी मुंबई नेहमीप्रमाणे सुरू होती. मस्जिद बंदर, मनीष मार्केट, भुलेश्वर मार्केट, दागिना बाजार, लालबाग मार्केट, दादर मार्केटसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील सर्वच माेठ्या बाजारपेठा सकाळपासून सुरू होत्या. शिवाय येथे ग्राहकांची गर्दी होती. मंडयांमध्येही नेहमीप्रमाणे गर्दी कायम होती. फेरीवाल्यांनीदेखील आपले बस्तान कायम ठेवल्याचे दिसत होते. लोकल, बेस्टमधील गर्दी मात्र नेहमीपेक्षा कमी होती.
मुंबई वगळता इतर शहरांमधील सर्व दुकाने, बाजारपेठा बंद होत्या. बहुतांश ठिकाणी सकाळी नऊपासूनच पोलिसांनी माईकवरुन निर्बंध पाळण्याचे आवाहन करीत गस्त घालण्यास सुरवात केली. त्यानंतर सुरू असलेल्या दुकाने बंद झाली तरी रस्त्यावरील लोकांची वर्दळ काही कमी झाली नव्हती.
- सरकारने अंशतः लॉकडाऊन जाहीर केले आणि प्रत्यक्षात ‘ब्रेक दि चेन’च्या नावाखाली संपूर्ण लॉकडाऊन लागू केल्याचा आरोप व्यापाऱ्यांचा आरोप
- ठिकठिकाणच्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून व्यक्त केल्या संतप्त भावना
- प्रशासनाने व्यापाऱ्यांची दिशाभूल केली, २५ दिवस दुकाने बंद ठेऊन कसे जगायचे, व्यापाऱ्यांचा आक्रोश