CoronaVirus Lockdown News: आज आणि उद्या राज्यात कडक निर्बंध; जाणून घ्या काय सुरू, काय बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 04:04 AM2021-04-10T04:04:39+5:302021-04-10T07:14:47+5:30
शुक्रवारी जारी केलेल्या नियमावलीतील मुद्दे असे...
सुपरमार्केट, मॉल्स सुरू राहतील का?
४ आणि ५ एप्रिलच्या शासकीय आदेशानुसार जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या कुठल्याही आस्थापना सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहतील. कोरोनाचे नियम पाळणे अनिवार्य असेल. या ठिकाणी जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंचे सेक्शन बंद राहतील. मात्र जीवनावश्यक वस्तूंची विक्री करता येईल. हे पूर्ण आठवड्यासाठी असेल.
वीकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद राहील?
जीवनावश्यक सेवा सुरू राहतील. शासकीय आदेशात नमूद असलेल्या योग्य कारणास्तव तसेच जीवनावश्यक सेवा देण्यासाठीच फिरता येईल.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे यार्ड सुरू राहतील का?
होय. मात्र कोरोना नियमांचे कडक पालन करावे लागेल. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन या ठिकाणी केले जात असल्याचे स्थानिक प्रशासनाच्या ध्यानात आले तर राज्य शासनाच्या परवानगीने बाजार समित्या बंद करता येतील.
आठवडाभर बांधकाम साहित्याची दुकाने सुरू राहतील का?
नाही.
गॅरेज, सर्व्हिसिंग सेंटर, गाड्यांच्या सुट्या भागांची दुकाने सुरू राहतील का?
वाहतूक सुरू राहण्यासाठी आवश्यक अशी गॅरेज सुरू राहतील. सुट्या भागांची दुकाने मात्र सुरू राहतील. गॅरेजमध्ये कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्थानिक प्रशासनास आढळल्यास असे गॅरेज कोरोना महामारी असेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.
केंद्र सरकार आणि सार्वजनिक उपक्रमांचे कर्मचारी जीवनावश्यक सेवांमध्ये मोडतात का?
नाही. सर्व कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक सेवांतील कर्मचारी समजता येणार नाही. फक्त सरकारने ज्या सेवा जीवनावश्यक मानल्या आहे, त्यातील कर्मचारीच जीवनावश्यक सेवेतील मानले जातील.
nनागरिकांना दारू विकत घेता येईल का?
होय. सरकारने ४ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार बारमधून पार्सल नेता येईल किंवा होम डिलिव्हरी घेता येईल.
दारूची दुकाने उघडी राहतील का? आणि तेथून होम डिलिव्हरी घेता येईल का?
नाही.
रस्त्यालगतचे ढाबे उघडे राहतील का?
होय. मात्र, रेस्टॉरन्टसाठीचे नियम ढाब्यांसाठीही लागू राहतील. केवळ पार्सल नेता येईल वा होम डिलिव्हरी घेता येईल.
एसी, कूलर आदी इलेक्ट्रिकल वस्तूंची दुकाने उघडी राहतील का?
नाही.
टेलिकम्युनिकेशन अंतर्गत मोडणाऱ्या वस्तूंची (लॅपटॉप, मोबाइल आदी) दुकाने सुरू राहतील का?
नाही.
शासकीय सेवांसाठी असलेली आपले सरकार सेवा केंद्र, सेतू सीएसई सेंटर, सेतू केंद्र, पासपोर्ट सेवा केंद्र ही अत्यावश्यक सेवा मानली जातील का?
होय. ही केंद्र सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील. शनिवारी, रविवारी बंद राहतील.
शनिवार, रविवारी सकाळी ७ च्या आधी वा रात्री ८ नंतर रेस्टॉरन्टला पार्सल देता येईल का?
सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत स्वत: जाऊन ग्राहक रेस्टॉरन्टमधून पार्सल घेऊ शकतील. पण रात्री ८ नंतर व सकाळी ७ च्या आधी केवळ ई-कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून होम डिलिव्हरी देता येईल. शनिवार, रविवारी स्थानिक प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळेतच होम डिलिव्हरी देता येईल. मात्र, या दोन्ही दिवशी रेस्टॉरन्टमध्ये जाऊन पार्सल घेता येणार नाही. दोन्हींत रेस्टॉरन्टमध्ये बसून खाता येणार नाही.