CoronaVirus Lockdown News: राज्यात काेणत्याही क्षणी लाॅकडाऊन?; ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 04:50 AM2021-04-04T04:50:40+5:302021-04-04T06:47:58+5:30
CoronaVirus Lockdown News: राज्यात संपूर्ण लॉकडाऊन अटळ असल्याचे मानले जाते. त्याची घोषणा केव्हाही होऊ शकते, अशी सध्याची स्थिती आहे.
मुंबई : हळूहळू काही सेवा बंद करण्याचा, काही भागांत कठोर निर्बंध लादून कोरोनाची साथ रोखण्याचा प्रयत्न सरकारने केला. मात्र, लोक ऐकत नाहीत. त्याऐवजी राज्यात एकदम बंद करून हळूहळू सेवा सुरू केल्यास त्याचा फायदा होतो, हा माझा अनुभव असल्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी संपादकांसोबतच्या बैठकीत केले. त्यामुळे राज्यात संपूर्ण लॉकडाऊन अटळ असल्याचे मानले जाते. त्याची घोषणा केव्हाही होऊ शकते, अशी सध्याची स्थिती आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या ऑनलाइन बैठकीला प्रसारमाध्यमांचे संपादक, मालक, वितरक यांच्यासमवेत आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आदी उपस्थित होते. कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण पाहता राज्यात कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे मत आरोग्यमंत्र्यांनी मांडले.
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी रात्री फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. लॉकडाऊन हा उपाय नाही; पण दृश्य स्वरूपात बदल दिसले नाहीत आणि काही वेगळा उपाय मिळाला नाही, तर पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रांतील मान्यवर, तज्ज्ञांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. संपादकांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी लॉकडाऊन अटळ असल्याचे स्पष्ट संकेत दिले. अन्य राज्यांमध्ये काय सुरू आहे, यावर मी बोलणार नाही.
अन्य राज्यांमध्ये काय सुरू आहे, यावर मी बोलणार नाही. मला महाराष्ट्रातील जनतेचा जीव मोलाचा आहे, असे पुन्हा एकदा स्पष्ट सांगितले. बैठकीत संपादकांनीही कोरोना साखळी तोडण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यावर सकारात्मक विचार करण्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली.
राज्य सरकार कुठलेही आकडे लपवत नाही. सर्व खरी माहिती दिली जात आहे, माध्यमांनीही जनजागृती करून कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करण्याचा निर्धार करावा. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
या उपायांवर चर्चा
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीचे उपाय, तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर, टेलिमेडिसिन, सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन, कामाच्या वेळांची विभागणी, स्थानिक पातळीवर साथ नियंत्रणाला प्राधान्य, दुकानदार-विक्रेते यांच्या चाचण्या करून त्यांना वस्तू विक्रीची परवानगी अशा उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली.
ज्येष्ठ डॉक्टरांची घेणार मदत : सध्या ८० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी राखून ठेवला आहे. खासगी डॉक्टर, करार स्वरूपाने डॉक्टरांच्या सेवा कशा उपयोगात आणता येतील, त्याचा विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
देशातील रुग्णसंख्या ८९ हजारांवर... : देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांचा आकडा ८९ हजार १२९ वर पोहोचला. याआधी २० सप्टेंबर रोजी एका दिवसात ९२ हजार ६०५ बाधितांची नोंद झाली होती. दरम्यान, मृतांचा आकडाही वाढला असून गेल्या २४ तासांत देशभरात ७१४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. -सविस्तर वृत्त/वर्ल्ड वाईड
टॉप १०- महाराष्ट्रातील हॉटस्पॉट
जिल्हा- सक्रिय रुग्ण
पुणे ७३,५९९
मुंबई ६०,८४६
नागपूर ५२,४०८
ठाणे ४८,६६०
नाशिक ३१,५१२
औरंगाबाद १४,३०२
अहमदनगर १२,८८१
नांदेड १०,७०२
जळगाव ७,६४१
लातूर ६,९७१