CoronaVirus: लॉकडाऊन राहणारच; पण उद्योग, व्यापाराला मर्यादीत सूट देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 04:08 AM2020-04-19T04:08:45+5:302020-04-19T06:55:44+5:30

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना; शेती, कृषीपुरक उद्योगांना परवानगी

CoronaVirus Lockdown will continue but industries will get some relaxation state government issues guidelines | CoronaVirus: लॉकडाऊन राहणारच; पण उद्योग, व्यापाराला मर्यादीत सूट देणार

CoronaVirus: लॉकडाऊन राहणारच; पण उद्योग, व्यापाराला मर्यादीत सूट देणार

Next

मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात टाळेबंदीचे (लॉकडाउन) काटेकोर पालन सुरू राहील, मात्र जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात. शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरू व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमावली व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवरच काही बाबींना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. सोमवार दिनांक २० एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

देशात लागू असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. नागरिकांनी त्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. मार्गदर्शक नियमावलीनुसार ग्रामीण भागातील उद्योग, निवडक व्यवसाय, व्यापारी आस्थापनांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवर परवानगी देण्यात येणार आहे. राज्यात टाळेबंदीची मुदत वाढवण्यात आली असली तरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यापुढेही नियमित सुरू राहील, त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही. नागरिकांनी कोरोना प्रसार रोखण्यासाठी घरातच थांबावे, घराबाहेर पडू नये, सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या सेवा सुरू राहतील
टाळेबंदी लागू असली तरी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी आहे. दवाखाने, हॉस्पिटल, औषधांची दुकाने, पॅथोलॉजी सेंटर, अ‍ॅम्बुलन्स सेवा सुरू आहेत. शेतीच्या मशागतीच्या कामांवरही कोणतही बंधन नाही. शेती आणि शेती उद्योगाशी संबंधीत सर्व कामे, दुकाने, व्यवहार सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये कडक अंमलबजावणी होणार
पुणे : पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यू दर लक्षात घेता पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

भारतात अडकलेल्या बहारिनच्या नागरिकांसाठी त्यांच्या दुतावासाने पुणे येथून विमानाने मायदेशी जाण्याची शनिवारी व्यवस्था केली. चेन्नईमार्गे ही विमानसेवा होती.

रोजगार हमीची कामे सुरू
तूर, कापूस, हरभरा खरेदी योजना देखील सुरू राहणार आहे. दूधव्यवसाय, पशुपालन, मत्स्योद्योगविषयक कामांनाही परवानगी आहे. रोजगार हमी योजनेची कामे सुरू राहणार आहेत. अनाथालये, वृद्धाश्रम आदी सामाजिक संस्थांचे कामकाजही सुरू राहील.
अंगणवाड्या बंद असल्या तरी बालकांना पोषण आहार घरपोच दिला जाणार आहे. शाळा, कॉलेज बंद असली तरी आॅनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यास सांगण्यात आले आहे. बँका, वित्तीय संस्थांचे व्यवहार सुरू राहणार असले तरी नागरिकांनी तिथे गर्दी करू नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Web Title: CoronaVirus Lockdown will continue but industries will get some relaxation state government issues guidelines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.