CoronaVirus Lockdown News: १ जूननंतर राज्यातील लॉकडाऊन वाढणार का?; आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 11:58 AM2021-05-23T11:58:57+5:302021-05-23T12:00:10+5:30
CoronaVirus Lockdown News: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१ मेपर्यंत राज्यात लॉकडाऊन
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. एप्रिल महिन्यात राज्यात दररोज ७० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा ३० हजारांच्या खाली आला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे ३१ मेनंतर लॉकडाऊन संपणार का, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली, लॉकडाऊन राहणार की हटणार? राज्यांचा मूड काय सांगतो? जाणून घ्या...
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या मोठ्या शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत लक्षणीय घटली आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे या शहरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ग्रामीण भागांत कोरोनानं हातपाय पसरले आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले. '१ जूनपासून निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथिल केले जातील. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध हळूहळू मागे घेतले जातील,' अशी माहिती टोपे यांनी दिल्याचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिलं आहे.
महाराष्ट्रात 1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार का?, मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट उत्तर
'सध्या राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. दुकानं केवळ सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू ठेवण्याची मुभा आहे. याचा परिणाम अनेक ठिकाणी दिसून आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. मुंबईसह एमएमआर रिजनमधील स्थिती नियंत्रणात आहे. नाशिक, नागपूरमधील परिस्थितीदेखील चिंताजनक नाही. त्यामुळे या भागातील निर्बंध १ जूनपासून हळूहळू शिथिल केले जातील. निर्बंध एकदम मागे घेण्याऐवजी टप्प्याटप्यानं मागे घेतले जातील. कोरोना रुग्णसंख्या कमी झालेल्या जिल्ह्यांसाठी या प्रकारचे निर्णय घेतले जातील,' अशी माहिती टोपेंनी दिली.
लॉकडाऊनबद्दल काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी कोकण दौरा केला. त्यावेळी त्यांना लॉकडाऊनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. 'कोरोना कमी होतोय हे नक्कीच. पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्यावेळी आपण अनुभव घेतलाय. गेल्यावेळीही आपण कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण, थोडीशी शिथिलता आली अन् कोविड चौपटीने वाढला'', असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.