CoronaVirus: चिंतेत भर! राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १२९७ वर; एकट्या मुंबईत ८५७ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 12:51 PM2020-04-09T12:51:31+5:302020-04-09T12:54:04+5:30
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ
मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १६२ नं वाढला असून यातील १४३ रुग्ण मुंबईतील आहेत. लोकसंख्येची घनता अतिशय जास्त असलेल्या भागांत कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे. या भागातला कोरोनाचा संसर्ग रोखण्याचं मोठं आव्हान मुंबई महापालिकेसमोर आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांचा झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १२९७ वर पोहोचला आहे. यातील ८५७ रुग्ण एकट्या मुंबईतले आहेत. राज्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण आढळले असून यापैकी १४३ मुंबईतले आहेत. तर जण कल्याण डोंबिवलीतले आहेत. याशिवाय पुणे, औरंगाबादमधील प्रत्येकी ३ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवड, नवी मुंबईत कोरोनाचे प्रत्येकी २ नवे रुग्ण आढळून आलेत. याशिवाय ठाणे, मीरा भाईंदर, वसई विरार, यवतमाळ, सिंधुदुर्गमध्ये कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
येत्या तीन-चार दिवसांत मुंबईतील रुग्णांच्या आकड्यात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज पालिका आयुक्त प्रवीण परदेशींनी वर्तवला आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा तीन ते साडे तीन हजारांवर जाईल. मात्र परिस्थिती नियंत्रणात असेल. ती हाताबाहेर जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दर दहा लाखांमागे साधारणत: ३०० कोरोनाचे रुग्ण सापडतील, असा माझा अंदाज आहे. जागतिक पातळीवर ही सरासरी १०० ते १५० इतकी आहे. मात्र फ्रान्स, इटलीमध्ये हाच आकडा १२०० च्या घरात असल्याची आकडेवारी त्यांनी सांगितली.