CoronaVirus News: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाखाच्या पुढे; देशातील एक तृतीयांश रुग्ण महाराष्ट्रात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 08:04 PM2020-06-12T20:04:43+5:302020-06-12T20:24:50+5:30
आज राज्यात ३ हजार ४९३ कोरोना रुग्णांची नोंद; गेल्या २४ तासांत १ हजार ७१८ रुग्णांची कोरोनावर मात
मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पुढे गेला आहे. आज राज्यात कोरोनाचे ३ हजार ४९३ रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा १ लाख १ हजार १४१ वर पोहोचला. गेल्या २४ तासांत १ हजार ७१८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. तर दिवसभरात १२७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.
A total of 47,793 people have been discharged from after making a full recovery from #COVID19, out of this 1718 were discharged today: Maharashtra health department https://t.co/Ro1jvpWF4Q
— ANI (@ANI) June 12, 2020
राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यात झपाट्यानं वाढ होत आहे. आज राज्यात जवळपास पावणे दोन हजार रुग्ण कोरोनातून बरे झाले. मात्र त्याचवेळी दुप्पट रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत राज्यात ४७ हजार ७९३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा साडे तीन हजारांहून अधिक आहे.
राज्यानं आज कोरोना बाधितांच्या बाबतीत १ लाखाचा टप्पा ओलांडला. यातील निम्माहून अधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील रुग्णांची संख्या ५४ हजारांच्या पुढे आहे. त्या खालोखाल रुग्णसंख्या ठाणे आणि पुण्यात आहे. या शहरांमधील रुग्णसंख्या अनुक्रमे १५ हजार आणि १० हजारांहून अधिक आहे. औरंगाबाद, पालघर, नाशिक, रायगड, सोलापूर, जळगाव जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या हजारपेक्षा अधिक आहे.
देशातील एक तृतीयांश कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा जवळपास तीन लाख इतका आहे. महाराष्ट्रपाठोपाठ तमिळनाडूचा क्रमांक लागतो. तमिळनाडूत कोरोनाचे ४० हजारांहून अधिक रुग्ण आहेत. त्यानंतर दिल्ली (३४ हजार), गुजरात (२२ हजार), उत्तर प्रदेश (१२ हजार) यांचा क्रमांक लागतो.
मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' घोषणांमुळे गोंधळ वाढला; फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
सावधान! 'या' महिन्यात भारतात कोरोना टोक गाठणार; वरिष्ठ डॉक्टरांकडून धोक्याचा इशारा
लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...