CoronaVirus Updates Maharashtra: कोरोनाचा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाच्या निर्णय घेण्याच्या तयारीत?; चाचपणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 06:44 PM2021-04-01T18:44:54+5:302021-04-01T19:06:04+5:30
Coronavirus Maharashtra Lockdown News: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाकरे सरकारची तयारी सुरू; हालचालींना वेग
मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगानं वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. धुळवड आणि त्यानंतर एक दिवस कोरोना रुग्णांची संख्या घटली. मात्र त्यानंतर लगेचच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन होईल की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांचे प्रचंड हाल झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. कित्येकांना पगार कपात सहन करावी लागली. त्यामुळे जनतेचा लॉकडाऊनला विरोध आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारनं इतर पर्यायांचा विचार करत आहे.
राज्यात कठोर निर्बंध लागणार; आगामी एक-दोन दिवसांत घोषणा करणार, राजेश टोपेंची माहिती
जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची सोय उपलब्ध व्हावी याची चाचपणी राज्य सरकारनं सुरू केली आहे. लॉकडाऊन करण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांना घरूनच काम कसं काम करता येईल या दृष्टीनं सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राज्य सरकार सर्व खाजगी कंपन्यांना तसे आदेश देण्याची शक्यता आहे. नागरिक घरी राहिल्यानं रस्त्यावरची गर्दी कमी होईल. ट्रेन, बस आणि मेट्रोमध्ये होणारी गर्दी टाळता येईल, असा सरकारचा विचार आहे. त्यासाठी वर्क फ्रॉम होमकडे सरकारनं विशेष लक्ष दिलं आहे. माहिती तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातल्या कंपन्यांना सरकार वर्क फ्रॉम होमसाठी आदेश देणार असल्याची चर्चा आहे.
मोठा दिलासा! आता ५०० रुपयांत होणार कोरोनाची 'RTPCR' चाचणी; राजेश टोपेंची घोषणा
राज्यात पुन्हा लॉकडाऊन?
राज्यात तुर्तास लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. सध्या २ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या चर्चा राजेश टोपे यांनी फेटाळून लावल्या आहेत. लॉकडाऊनसंदर्भात तुर्तास तरी चर्चा सुरू आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असं राजेश टोपे म्हणाले.
लॉकडाऊन करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र याबाबत सरकारची चर्चा सुरु आहे. त्यामुळे लॉकडाऊनबाबत सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे असते. राज्यात ५० टक्के लॉकडाऊन लागणार, हे वृत्त राजेश टोपे यांनी फेटाळून लावले. पण सध्याची परिस्थिती पाहता कठोर निर्बंध लादणे गरजेचे आहे. येत्या एक-दोन दिवसांत या निर्बंधाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. आम्ही लॉकडाऊन हा सर्वात शेवटचा पर्याय ठेवला आहे. शेवटी जीव वाचवायचा असेल तर लॉकडाऊन करणे भागच आहे, असा इशारा देखील राजेश टोपे यांनी दिला आहे.