Coronavirus in Maharashtra: पुणे, मुंबईनंतर नागपुरातही आढळला कोरोनाचा रुग्ण, राज्यात आतापर्यंत ११ जणांना संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 09:59 PM2020-03-11T21:59:05+5:302020-03-11T22:09:41+5:30
Coronavirus in Maharashtra: नागपूरातील मेडिकलमध्ये तीन तर मेयोमध्ये तीन संशयीत रुग्णांना दाखल करण्यात आले होते.
नागपूर : कोरोना विषाणूच्या संशयीत रुग्णांची संख्या वाढत आहे. नागपूरातील मेडिकलमध्ये तीन तर मेयोमध्ये तीन संशयीत रुग्णांना दाखल करण्यात आले होते. तसेच यामधील पाच रुग्णांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यातील मेयोतल्या एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 11 वर पोहचली आहे.
पुण्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची दिसून येत असून मंगळवारी पाच असणारी बाधितांची संख्या आता आठवर पोचल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पुण्यात आठ आणि मुंबईत दोन आणि आता नागपूरात एक अशा एकूण 11 व्यक्तींना महाराष्ट्रात कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
दुबईहून प्रवास करून आलेल्या पुण्यातील दोन प्रवासी मंगळवारी कोरोना बाधित आढळून आले. यामुळे त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेतल्यानंतर आरोग्य विभागाला यवतमाळ जिल्ह्यातील १० तर नागपुरातील तीन प्रवासी आढळून आले. यवतमाळ येथील दहाही प्रवाशांची प्रकृती बरी असल्याने आणि कुठलेही लक्षणे आढळून आलेली नाहीत. यामुळे त्यांचे नमुने घेण्यात आलेले नाहीत. परंतु त्यांना घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.