CoronaVirus: जितेंद्र आव्हाड व्हेंटिलेटरवर नाहीत; ऑक्सिजन सपोर्ट सुरू, प्रकृती स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 09:12 PM2020-04-24T21:12:23+5:302020-04-24T21:14:29+5:30
दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर, त्यांची कोरोना चाचणी केली असता, ते 'पॉझिटिव्ह' असल्याचं निष्पन्न झालं.
महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं वृत्त IANS या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
दोन दिवसांपूर्वी रात्री अचानक जितेंद्र आव्हाड यांची तब्येत बिघडली होती. त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. जवळचे काही सहकारी, सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं आव्हाड यांनी लगेचच कोरोना चाचणी केली होती. ती 'निगेटिव्ह' आली. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून, 13 एप्रिलपासून त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केलं होतं. त्यांनी स्वतःच ट्विटरवरून ही माहिती दिली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर, पुन्हा चाचणी केली असता, आव्हाड यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. तेव्हापासून, फोर्टिस हॉस्पिटलचे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.
Sad to learn that Maharashtra Housing Minister & dear friend Jitendra Awhad has tested Corona Positive. Always a people's man, he has been very active all these days trying to help those in need. I wish and pray for his early recovery. @Awhadspeaks
— Raj Babbar (@RajBabbarMP) April 24, 2020
त्यानंतर, आज जितेंद्र आव्हाड व्हेंटिलेटरवर असल्याच्या बातम्या काही प्रासरमाध्यमांनी दिल्या. या संदर्भात त्यांच्या निकटवर्तीयांना संपर्क साधला असता, आव्हाड यांचा ताप कमी झाला असून ते व्हेंटिलेटवर नसल्याचं सांगण्यात आलं. अधे-मधे त्यांना ऑक्सिजन सपोर्ट द्यावा लागतोय, पण त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉक्टरांकडून आव्हाड यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतल्याचंही समजतं.