CoronaVirus: उत्तर महाराष्ट्रात मालेगाव ‘हॉटस्पॉट’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 03:45 AM2020-04-19T03:45:45+5:302020-04-19T03:46:39+5:30

नाशिकला चार, जळगावला दोन, तर नंदुरबार आणि धुळ्यात प्रत्येकी एक रुग्ण

CoronaVirus Malegaon becomes covid 19 hotspot in North Maharashtra | CoronaVirus: उत्तर महाराष्ट्रात मालेगाव ‘हॉटस्पॉट’

CoronaVirus: उत्तर महाराष्ट्रात मालेगाव ‘हॉटस्पॉट’

googlenewsNext

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात शनिवारी ८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात नाशिकला चार, जळगावला दोन, तर नंदुरबार आणि धुळ्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक शहरातील चारही बाधित रुग्ण हे एकाच कुटुंबातील असून, नाशकात संपूर्ण कुटुंबाला बाधा होण्याची ही पहिलीच घटना आहे. विभागात मालेगावच ‘हॉटस्पॉट’ असल्याचे दिसून येत आहे.

उत्तर महाराष्ट्रातील शनिवारपर्यंतच्या बाधित रुग्णांची संख्या १०५ वर पोहोचली आहे. कोरोनापासून मुक्त असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात शनिवारी प्रथमच एक बाधित रुग्ण आढळून आल्याने विभागातील पाचही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग स्पष्ट झाला आहे. नाशिकला नव्याने ४ बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या ७४ झाली आहे. मालेगावमध्ये शनिवारी सायंकाळपर्यंत एकही नवीन बाधित आढळून आला नसला तरी आत्तापर्यंत सर्वाधिक ६२ बाधित एकट्या मालेगाव शहरातील असल्याने व तेथील मृतांची संख्या ४ झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात २४ रुग्ण उपचार घेत आहेत. तीन जण ठणठणीत बरे झाले आहे. जिल्ह्यात ५ ठिकाणे ‘हॉटस्पॉट’ घोषित केली आहे. त्यात नगर शहरात मुकुंदनगर, जामखेड तालुक्यातील आलमगीर, नेवासा शहर, संगमनेर यांचा समावेश आहे. सध्या ५७ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

जळगाव, धुळे, नगरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत दोन कोरोनाबाधित आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. दुसरा रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आहे. जळगाव जिल्ह्याला अद्याप १६ अहवालांची प्रतीक्षा आहे. जळगाव, धुळे आणि नगर येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

नंदुरबार बचावले
नाशिक विभागात रुग्ण मृत्यूच्या बाबतीत नंदुरबार काहीसे सुदैवी ठरले आहे. जिल्ह्यात ९६ संशयितांची कोरोना तपासणी झाली असून ७७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १९ जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत.

Web Title: CoronaVirus Malegaon becomes covid 19 hotspot in North Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.