CoronaVirus News : नव्या करोनाचा धोका! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले महत्त्वाचे निर्देश

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 22, 2020 07:42 PM2020-12-22T19:42:11+5:302020-12-22T19:44:57+5:30

ठाकरे म्हणाले, 'करोना विषाणूला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी प्रचंड मेहनत घेतली. आता दुसऱ्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. (coronavirus new strain)

CoronaVirus Marathi News coronavirus new strain CM Uddhav Thackeray issued important instructions to all administrative bodies in the state | CoronaVirus News : नव्या करोनाचा धोका! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले महत्त्वाचे निर्देश

CoronaVirus News : नव्या करोनाचा धोका! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले महत्त्वाचे निर्देश

googlenewsNext

मुंबई - इंग्लंडसह युरोपातील काही देशांमध्ये करोना विषाणूचा नवान प्रकार आढळून आला आहे. याचा प्रसार वेगाने होत असल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील प्रशासकीय यंत्रणांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने संवाद साधला. यावेळी, करोना विषाणूला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी मोठी मेहनत घेतली असून आता दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवरही गाफील राहून चालणार नाही, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी प्रशासकीय यंत्रणांना काही महत्त्वाचे निर्देशही दिले.

यासंदर्भात, ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्ह्यांचे पोलीस अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करोना स्थिती, करोना विषाणूचा नवा प्रकार, या अनुषंगाने घ्यावयाची काळजी आणि  लसीकरणाच्या तयारीसंदर्भात आढावा घेतला. तसेच, कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे आणि मास्कचा वापर बंधनकारक करावा, अशा सूचना दिल्या.

नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही -
ठाकरे म्हणाले, 'करोना विषाणूला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी प्रचंड मेहनत घेतली. आता दुसऱ्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. याला रोखण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. यासाठी औषधी, ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटर्सचा पुरेसा साठा करून ठेवावा, विलगीकरणाची व्यवस्था सज्ज ठेवण्यात यावी. ज्या वेगाने हा विषाणू पसरतो त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांचीही क्षमता ठेवावी. एवढेच नाही, तर स्थानिक पातळीवर करोना विषाणूमध्ये काही जेनेटिक बदल होतात का? तसेच, या नव्या करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उपचाराच्या पद्धतीसंदर्भातही टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी अभ्यास करावा. अशा सूचनाही ठाकरे यांनी यावेळी केल्या.

करोना चाचण्यांवर अधिक भर द्या -
आपण उन्हाळा आणि पावसाळ्यातील साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविले. मात्र, आता हिवाळ्यातील सर्दी, खोकला आणि ताप हे आजार वाढले आहेत. हे लक्षात घेऊन करोना चाचण्यांवर अधिक भर द्यावा. यासाठी राज्यातील करोना चाचणीच्या प्रयोगशाळांचा संपूर्ण क्षमतेनिशी वापर करावा. आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत सहव्याधी असलेल्या लोकांची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडे आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणेने अशा रुग्णांशी संपर्क साधावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

मास्कचा वापर बंधनकारक करण्यात यावा -
यावेळी ठाकरे यांनी करोना लसीकरणाच्या तयारीसंदर्भातही आढावा घेतला. तसेच, लसीकरण करणारी यंत्रणा, ज्यांना पहिल्या टप्प्यात लस द्यायची आहे, अशा आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती पाठवणे, शीतगृहांची व्यवस्था तसेच प्रशिक्षण आदींचा आढावा घेतला. तसेच जिल्हा टास्क फोर्सने लसीकरणासंदर्भात बैठका घ्याव्यात, असा आदेशही त्यांनी दिला आहे. याशिवाय मास्क वापरल्याने करोनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिबंध घालता येतो. यामुळे नागरिकांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात यावा. तसेच मास्क न वापरणाऱ्यांना दंड आकारण्यात यावा आणि मास्कचा वापर, हात धुणे आणि सोशल डिस्टंसिंगसंदर्भात पुन्हा जनजागृती करण्यात यावी, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

विविध राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या या प्रवाशांवर लक्ष ठेवावे -
आजपासून महानगरपालिका हद्दीत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकाळात अनावश्यक रहदारी टाळावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय आणि विविध राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या या प्रवाशांवर लक्ष ठेवावे. त्यासाठी इतर राज्यांशी समन्वय ठेवावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, आदी उपस्थित होते.

Web Title: CoronaVirus Marathi News coronavirus new strain CM Uddhav Thackeray issued important instructions to all administrative bodies in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.