CoronaVirus News: हीच ती वेळ; राज ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांना तीन महत्त्वाच्या सूचना; अप्रत्यक्षपणे मांडला 'मनसे'चा अजेंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 04:13 PM2020-05-07T16:13:41+5:302020-05-07T16:23:20+5:30
CoronaVirus marathi News कोरोना संकटाबद्दल मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला राज ठाकरे उपस्थित
मुंबई: राज्यातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली. मंत्रालयात झालेल्या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांना केलेल्या सूचनांची माहिती दिली.
लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे ठप्प असल्यानं परप्रांतीय मजूर त्यांच्या राज्यात परतले आहेत. त्याचा संदर्भ देत राज यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. 'परराज्यातून महाराष्ट्रात आलेले मजूर, कामगार आता त्यांच्या राज्यांमध्ये गेले आहेत. इथले उद्योगधंदे सुरू झाले की ते पुन्हा येतील. त्यावेळी त्यांची चाचणी करुनच त्यांना राज्यात प्रवेश देण्यात यावा. आपल्या राज्यातील परिस्थिती आपल्याला माहीत आहे. मात्र तिथल्या परिस्थितीची कल्पना आपल्याला नाही. त्यामुळे येताना त्यांची तपासणी केली जावी. त्यानंतरच त्यांना प्रवेश देण्यात यावा,' अशी सूचना मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं राज यांनी सांगितलं.
परप्रांतीय मजूर पुन्हा राज्यात येतील. तेव्हा त्यांची स्थलांतरित कायद्यांतर्गत नोंद करण्यात यावी, अशी आग्रही मागणी राज यांनी केली. परप्रांतीयांमुळे इथल्या सोयी सुविधांवर ताण येतो. त्यामुळे गोंधळ निर्माण होतो, हे आपण पाहिलं आहे. आता कोरोना संकटाच्या निमित्तानं परप्रांतीय मजूर राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे निर्माण झालेला गोंधळ दूर करण्याची हीच ती वेळ, असं राज ठाकरे म्हणाले. परप्रांतीय मजूर पुन्हा राज्यात येताना त्यांची नोंद व्हायला हवी, असं राज यांनी म्हटलं.
परप्रांतीय मजूर त्यांच्या गावी गेल्यानं इथे नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्या स्थानिक तरुण-तरुणींना मिळायला हव्यात. त्यासाठी राज्य सरकारनं अशा रोजगाराच्या संधींची माहिती मराठी तरुण-तरुणींमार्फत पोहोचवायला हवी, अशी सूचना राज यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. राज्यातील रोजगार स्थानिकांना मिळायला हवी, या भूमिकेचा राज यांनी पुनरुच्चार केला. प्रत्येक वेळी माणुसकी माणुसकी करुन चालणार नाही. या राज्यावर जेव्हा संकट येईल, तेव्हा परप्रांतीय मजूर पळून जातील, हे मी आधीच म्हटलं होतं, याकडेही राज यांनी लक्ष वेधलं.
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला मास्कशिवाय पोहोचले राज ठाकरे
मंत्रालयातील बैठकीला येताना तुम्ही मास्क का घातला नाही?; राज ठाकरे हसत हसत म्हणाले...
महाराष्ट्रातून जाणाऱ्या मजुरांनी रेल्वेतून अन्न फेकलं?; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य