CoronaVirus in Ratnagiri धक्कादायक! रत्नागिरीत कोरोनाचा दुसरा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 10:08 PM2020-05-10T22:08:11+5:302020-05-10T22:08:51+5:30
माटवण गावातील ६५ वर्षीय महिला सायन व के. इ. एम. रुग्णालय मुंबई येथून उपचार घेऊन दापोलीत आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी दुसरा बळी गेला आहे. दापोलीतील ६५ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा जिल्हा रुग्णालयात रविवारी रात्री मृत्यू झाला.
ही महिला मुंबईहून दापोली तालुक्यात ४ मे रोजी आली होती. माटवण गावातील ६५ वर्षीय महिला सायन व के. इ. एम. रुग्णालय मुंबई येथून उपचार घेऊन दापोलीत आली होती. दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयातील उपचार सुरू असताना तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तिला रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. श्वसनाच्या त्रासामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी खेड तालुक्यातील अलसुरे गावातील एकाचा कोरोनामुळे बळी गेला होता.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी रात्री उशिराने दापोलीतील तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तर रविवारी सायंकाळी जिल्ह्यातील ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे. रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील ४ तर संगमेश्वरातील ४ जणांचा समावेश आहे. रत्नागिरीत आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीचाही समावेश आहे.
जिल्ह्यात आठवडाभराच्या कालावधीत ३७ कोरोनाबाधित रुग्ण वाढले असून, त्यातील ३६ जण मुंबईकर आहेत़ शनिवारी मंडणगड तालुक्यातील ११ आणि खेडमधील २ असे एकूण १३ रुग्ण सापडले होते. त्यानंतर रात्री उशिरा दापोली तालुक्यातील दर्दे येथील ३५ वर्षीय तरुण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले़ हा तरुण मुंबईतील जोगेश्वरी येथून ७ मे रोजी दापोलीत गावी जाण्यासाठी आला होता़ त्याला प्रशासनाने दापोली येथील डॉ़ बाळासाहे सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या किसान भवनात विलगीकरण केंद्रात क्वारंटाईन केले होते़