Coronavirus: घराकडे गेलेले परप्रांतीय म्हणतात महाराष्ट्रच बरा; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 10:04 AM2020-05-15T10:04:00+5:302020-05-15T10:06:00+5:30
राज्यातील परप्रांतीयांना दिला आहे तिथे थांबण्याचा सल्ला
अविनाश कोळी
सांगली : हातातील रोजगार सोडून भावनिक होत उत्तर प्रदेशात त्यांच्या गावी परतलेल्या तरुणांनी त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दलचा एक व्हिडिओ सांगलीतील उत्तर भारतीयांच्या मोबाईलवर पाठविला. महाराष्ट्रातील उपाययोजना, याठिकाणी मिळत असलेले लोकांचे प्रेम, आधार उत्तर प्रदेशात शोधूनही सापडत नसल्याची भावना त्यांनी यात मांडली आहे. हा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल झाल्याने कामगारांचे उत्तर प्रदेशला जाण्याचे प्रमाण घटले आहे.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून गेल्या दोन दिवसात तीन हजारावर कामगार उत्तर प्रदेशात रवाना झाले. विशेष रेल्वेने त्यांना पाठविण्यात आले. या दोन्ही जिल्ह्यात त्यांचे रोजगाराचे बस्तान बसले असतानाही कोरोनाच्या भीतीने तसेच कुटुंबाच्या आठवणीने भावनिक होत त्यांनी हे दोन्ही जिल्हे सोडण्याचा निर्णय घेतला. सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अन्य जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीयांचे लोंढे त्यांच्या गावाकडे परतत आहेत. त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची सिरक्षित रवानगी करताना महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी, जिल्हा प्रशासनाने त्यांची सर्व प्रकारची सोय केली.
जाताना परप्रांतीयांसाठी महाराष्ट्रातून पुरेसे जेवण, पाणी, चहा, नाष्टा आणि प्रवासात आवश्यक असलेले साहित्य, वैद्यकीय उपचार अशा सर्व सुविधा पुरविण्यात आल्या. महाराष्ट्राची सीमा ओलांडून उत्तर प्रदेशात गेलेल्या या परप्रांतीय कामगारांना त्याठिकाणचे चित्र अस्वस्थ करून गेले. रेल्वेतून उतरल्यानंतर गोरखपूर, देवरिया, कुशीनगर, महाराजगंज, गाजीपूर, जौनपूर अशा अनेक जिल्ह्यासाठी मिळेल त्या वाहनाने हे कामगार गावाच्या दिशेने जाऊ लागले. अनेक रस्त्यांवर गर्दी, गोंधळ त्यांना दिसून आला. प्रशासकीय स्तरावर कोणत्याही उपाययोजना त्यांना दिसत नव्हत्या. पाणी आणि जेवणाविना या कामगारांचे हाल होत आहेत.
एका ट्रकवर उभे राहून काही तरुणांनी त्याठिकाणच्या परिस्थितीचा एक व्हिडिओ तयार करून महाराष्ट्रात पाठविला. त्यात एक तरुण म्हणतो, महाराष्ट्रातून जेवण, पाणी, नाष्टा व सर्व सुविधांचा आनंद घेऊन आम्ही उत्तर प्रदेशात आलो आणि आता अन्न-पाण्याविना आमचे हाल होत आहेत. महाराष्ट्राने जे दिले ते कधीही विसरू शकत नाही. त्यांनी ज्या गोष्टी आमच्यासाठी केल्या त्या कुणीही केल्या नाहीत. त्यामुळे जे महाराष्ट्रात थांबले आहेत, ते नशिबवान आहेत. महाराष्ट्रच संकटात चांगली मदत परप्रांतीयांना करीत आहे. गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतीय कामगारांसह येथील उद्योजकांच्या मोबाईलवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हिडिओचा सकारात्मक परिणाम
या व्हिडिओमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात सध्या असलेल्या परप्रांतीय कामगारांमध्ये सकारात्मक परिणाम होत आहे. राज्याकडे व गावाकडे परतण्याचा बेत ते आता रद्द करीत आहेत. त्यामुळे येथील उद्योग व व्यवसायिकांनाही त्यामुळे दिलासा मिळाला आहे. परतीच्या प्रवासाकरीता रेल्वे व बसची नोंद करूनही ऐनवेळी जाण्याचा निर्णय बदलणाऱ्या कामगारांची संख्या वाढत आहे. बुधवारी अशा जवळपास ५0 हून अधिक कामगारांनी येथेच थांबण्याचा निर्णय घेतला.