CoronaVirus: बच्चू कडूंनी अनुभवलेले तीन दिवस कोरोनाचे; वाचून अंगावर काटा येईल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 04:37 PM2020-03-31T16:37:32+5:302020-03-31T16:40:36+5:30
Coronavirus कोरोनाची लक्षणं दिसून आल्यानं बच्चू कडू होम क्वॉरेंटाईन
अमरावती: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाची लक्षणं आढळून आल्यास तातडीनं रुग्णालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं जात आहे. घराबाहेर पडणं टाळा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, असं आवाहन पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांनी केलं आहे. आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनीदेखील हेच आवाहन केलं आहे. काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांचा घसा खवखवत होता. थोडा खोकलाही होता. मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. यानंतर काही दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या दरम्यानची मनाची घालमेल बच्चू कडूंनी फेसबुकच्या माध्यमातून मांडली आहे.
२३ तारखेला बच्चू कडूंचा घसा थोडा खवखवत होता. खोकलादेखील होता. सिव्हिल सर्जनशी बोलून त्यांनी औषधं घेतली आणि कामाला लागले. मात्र मनात विचारचक्र सुरूच होतं. या दिवसांत बच्चू कडू यांचा मुलगा देवा आणि पत्नी नयना यांनी त्यांना घरी राहण्यास सांगितलं. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहाता कडू कामाला लागले. यानंतर कडू यांची तपासणी झाली. त्याचे अहवाल काहीसे संशयास्पद असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
वैद्यकीय अहवालाची माहिती समजताच बच्चू कडूंना काळजी वाटू लागली. मग त्यांनी घरात वेगळं राहण्यास सुरुवात केली. पत्नी आणि मुलगा घराबाहेर पडू नका, असं अनेकदा सांगत असूनही आपण त्यांचं ऐकलं नाही, यामुळे त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. आपल्यामुळे कुटुंबीयांना, इतर लोकांना कोरोना झाल्यास काय होईल, आपण गेल्या काही दिवसांत शेकडो लोकांच्या भेटीगाठी घेतल्यानं आपल्यामुळे किती जणांचा जीव जाईल, या चिंतेनं झोपही लागली नाही, असं बच्चू यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
घरातच वेगळं राहणाऱ्या बच्चू कडू यांचं काम फोनच्या माध्यमातून सुरू होतं. पण कोरोनाचा तपासणी अहवाल कसा येईल, तो पॉझिटिव्ह आला तर काय, आपल्यामुळे अनेकांचं जीव गेले तर काय, असं विचारांचं काहूर त्यांच्या मनात माजलं होतं. २९ तारखेला कडू यांची पुन्हा तपासणी झाली. त्याचा अहवाल दोन दिवसांत मिळणार होता. हे दोन दिवस कडू यांच्यासाठी अतिशय होते. या दिवसात मरण डोळ्यासमोर पाहिल्याची भावना त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.
बच्चू कडू यांचा कोरोनाचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यावेळी पत्नीला मी निवडून आलो, तेव्हा झालेल्या आनंदापेक्षाही जास्त आनंद झाला होता, असं बच्चू कडूंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे. आपण ३ दिवस स्वत:चा मृत्यू पाहिल्याचं त्यांनी म्हटलं. आपल्यामुळे आपला परिवार, गाव, देश अडचणीत येऊ नये. यासाठी घरीच राहण्याचं अतिशय कळकळीचं आवाहन बच्चू कडूंनी केलं आहे. नियम पाळा, कोरोना टाळा, असा मंत्र त्यांनी पोस्टच्या शेवटी दिला आहे.