Coronavirus: लसीकरणासाठी ‘मिशन कवच कुंडल’; दसरा, दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट धडकणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 08:51 AM2021-10-08T08:51:50+5:302021-10-08T08:52:24+5:30
Coronavirus updates in Maharashtra: कोरोनामुळे सुमारे १ लाख ४० हजार नागरिक मरण पावले आहेत. यासाठी ‘एसडीआरएफ’मधून सुमारे ७०० कोटी रुपयांची तरतूद केली जाईल.
मुंबई : राज्यातील कोविड प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी ८ ते १४ ऑक्टोबरदरम्यान मिशन कवच कुंडल राबविण्यात येणार आहे. या अभियानात राज्यात दररोज १५ लाखाहून अधिक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
टोपे म्हणाले की, अभियानासाठी पुरेशी लस उपलब्ध आहे. सध्या ७५ लाख लस आहेत. आणखी २५ लाख लसी मिळतील. राज्यातील सहा कोटी लोकांचे लसीकरण झाले असून, सव्वातीन कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण शिल्लक आहे.
पहिला डोस घेतलेल्यांचे प्रमाण ६५ टक्के आहे. लसीकरणाचा वेग वाढावा, यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन, खासगी डॉक्टर,
रोटरी क्लब, लायन्स क्लब आदींचा सहभाग घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. कोविडमुळे मृत्यू पावलेल्या राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे सुमारे १ लाख ४० हजार नागरिक मरण पावले आहेत. यासाठी ‘एसडीआरएफ’मधून सुमारे ७०० कोटी रुपयांची तरतूद केली जाईल.
दसरा, दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता
राज्यात मंदिरे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, अजूनही कोरोनाचे संकट संपलेले नाही. दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार विशेष लसीकरण करीत आहोत. जेणेकरून आरोग्यावर जास्त गंभीर परिणाम होणार नाही. - राजेश टोपे, आरोग्यमंत्री