CoronaVirus: गरजूंना मदत कराच, पण...; राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना मोलाची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 12:45 PM2020-04-14T12:45:02+5:302020-04-14T12:45:55+5:30
coronavirus राज यांचं मनसेसह सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचं आवाहन
मुंबई: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लागू असलेला लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. देशात लॉकडाऊन सुरू असल्यानं अनेकांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे येत आहेत. मात्र काही जण गरजूंना मदत करत असताना फोटो सेशन करत असल्याचं समोर येत आहे. अशा प्रकारे फोटो सेशन न करण्याचं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरेंनीमनसेसह सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.
कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्र सैनिक गरजूंच्या मदतीला धावून जात आहे. त्यांची छायाचित्रंही एमएनएस अधिकृतच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या त्या भागातील लोकांना गरज असल्यास कोणाशी संपर्क साधायचा, या हेतूनं हे करण्यात येणार असल्याचं राज यांनी ट्विट करून सांगितलं. काही मोजके जण कॅमेऱ्याकडे बघून मदतकार्याची छायाचित्रं काढणं, ज्याला मदत दिली जातेय त्याला कॅमेऱ्यात बघण्यास सांगणं किंवा गॉगल लावून मदतकार्य करतानाची छायाचित्रं काढणं या चुकीच्या गोष्टी करत असल्याचं राज यांनी ट्विटर प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
आपण ज्याला मदत करत आहोत त्याचा चेहरा दाखवून आपण त्याला अधिक लाजवत नाही आहोत का, असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला आहे. मुळात प्रत्येक माणूस स्वाभिमानी असतो आणि शक्यतो त्याला मदत घेणं नको असतं. पण आज प्रसंग बाका आहे. त्यामुळे तो नाईलाजानं मदत स्वीकारत आहे. अशा वेळेस त्याची छायाचित्रं काढून त्याची मान शरमेनं खाली घालणं कितपत योग्य आहे? तसंच मदतकर्त्यानंदेखील कॅमेऱ्यात बघत फोटो काढणं हेदेखील योग्य आहे का?, असे काही महत्त्वाचे प्रश्न राज यांनी विचारले आहेत.