नात्यांमध्ये दुरावा का?; नातेवाईकांनी पाठ फिरवली, मनसेच्या नगरसेवकांनी घेतली वृद्धाची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 06:02 PM2020-08-13T18:02:14+5:302020-08-13T18:02:59+5:30
पुण्याच्या पर्वती भागात दत्तोबा चोंडे आणि त्यांच्या पत्नी राहत होत्या. १० ऑगस्टला महापालिकेच्या शिक्षकांकडून या भागात सर्व्हे करण्यात आला.
पुणे – कोरोना व्हायरसच्या संकटामुळे माणूस माणसांपासून दुरावत चाललाय की काय? असा प्रश्न निर्माण होतो. पुण्यात एक अशीच घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका ९६ वर्षीय वृद्ध व्यक्तीला पाहण्यासाठी कोणीच आलं नाही. तीन दिवसांपूर्वी दत्तोबा चोंडे यांच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन झालं. त्यानंतर एकटे पडलेल्या दत्तोबा यांच्या मदतीसाठी कोणीच पुढे सरसावलं नाही.
पुण्याच्या पर्वती भागात दत्तोबा चोंडे आणि त्यांच्या पत्नी राहत होत्या. १० ऑगस्टला महापालिकेच्या शिक्षकांकडून या भागात सर्व्हे करण्यात आला. तेव्हा दत्तोबा चोंडे यांच्या पत्नीची ऑक्सिजन पातळी कमी असल्याचं दिसून आलं. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी चोंडे यांच्या नातेवाईकांना संपर्क साधला परंतु आम्ही खासगी लॅबमध्ये टेस्ट केली आहे असं सांगत त्यांनी आजींच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ११ ऑगस्टला आजीचं निधन झालं त्यानंतर महापालिका कर्मचारी आणि काही नातेवाईकांच्या उपस्थितीत आजीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर घरात एकटे पडलेल्या दत्तोबा चोंडे यांची कोरोना चाचणी करण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही.
या घटनेची माहिती मनसेचे नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांना मिळताच त्यांनी तात्काळ पर्वती गाठले. त्यांनी कुटुंबाला संपर्क साधला पण कोणीच आलं नाही. याबाबत वसंत मोरे म्हणाले की, ज्याचं कोणी नाही त्याचं आम्ही आहोत, ९६ वर्षीय वृद्धाला घरातले कोणीच नातेवाईक येत नाही, संपर्क साधला तर आम्ही क्वारंटाईनमध्ये आहोत असं सांगितलं. हाकेच्या अंतरावर कोरोना टेस्ट सेंटर आहे. पुणे मनपाची जबाबदारी आहे तशी घरच्यांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे नात्यात दुरावा का निर्माण झालाय असा प्रश्न पडतो. आम्ही गाड्यांमध्ये पीपीई किट्स घालून फिरतोय, दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहे महापालिका कुठे कुठे पाहणार? आपलीही जबाबदारी अशा लोकांची काळजी घेणे आहे असं ते म्हणाले.
तर प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. घरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर इतरांनी चाचणी करणे गरजेचे आहे. या वृद्धाच्या घरी कोणीच नाही, त्यांना पाहण्यासाठी कुणीच येत नाही. नातेवाईक बघायला येत नाही. ४-५ दिवसांपूर्वी आजीची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानं त्यांचाही मृत्यू झाला. माणुसकी म्हणून आम्ही पुणे शहरात कुठेही मदत लागली तरी आम्ही दोघं नक्कीच मदत करु, संकट काळात माणुसकी हरवू नका असं मनसे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी सांगितले.
...तर आजीचा जीव वाचला असता
आजीची ऑक्सिजन पातळी कमी आहे असं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना सांगितले. पण नातेवाईकांनी आम्ही खासगी लॅबमध्ये टेस्ट केली आहे असं सांगितले. आजी चालत होत्या, बोलत होत्या, टेस्टिंग केली असं नातेवाईकांनी सांगितले. त्याचा रिपोर्ट आला नव्हता. महापालिकेने सांगितल्याप्रमाणे नातेवाईकांनी ऐकलं असतं तर कदाचित आजी जिवंत असती. आजी गेल्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्या घरी दोघ वृद्ध जोडपं एकटेच राहत होते. आम्ही दत्तोबा चोंडे यांना महापालिकेच्या लॅबमध्ये घेऊन आलो, त्यांची कोरोना चाचणी केली, सुदैवाने या वयातही कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याचा आनंद आहे. फक्त पीपीई किट्स, अन्यधान्य वाटल्याने लोकप्रतिनिधींची जबाबदारी संपत नाही असं वसंत मोरे म्हणाले.