CoronaVirus News: राज्यात सर्वाधिक लक्षणेविरहित रुग्ण; केवळ एक टक्का गंभीर अवस्थेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 03:27 AM2020-10-07T03:27:43+5:302020-10-07T03:27:54+5:30
CoronaVirus News: वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची माहिती
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब असली, तरी १४ लाख ४२ हजार ९६८ कोरोनाग्रस्तांपैकी तब्बल २ लाख ३१ हजार ५२८ रुग्ण एकही लक्षण नसलेले आणि सौम्य लक्षण असलेले आहेत. ज्याचे प्रमाण १६ टक्के आहे.
राज्यात ११ लाख ४९ हजार ६०३ रुग्ण म्हणजे एकूण ८० टक्के कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात फक्त एक टक्का म्हणजे ९,७५७ गंभीर रुग्ण आहेत. दरम्यान, १३,९९६ एवढे रुग्ण आयसीयू बाहेरील असून, आॅक्सिजनवर आहेत. त्यांचेही प्रमाण १ टक्का आहे, तर आतापर्यंत ३८,०८४ रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला असून, राज्यातील मृत्युदर या आकडेवारीनुसार २ टक्के आहे.
राज्यात २ लाख ५८ हजार १०८ रुग्ण सक्रिय आहेत. त्यातही लक्षण नसलेल्या, सौम्य लक्षणे असलेल्या, तसेच बरे होत असलेल्या रुग्णांचे प्रमाण ९१ टक्के आहे. गंभीर रुग्णांची संख्या १३,९९६ असून, हे प्रमाण ५ टक्के आहे. आयसीयूबाहेर पण आॅक्सिजनवर असलेल्या रुग्णांचे प्रमाण ४ टक्के आहे.
राज्यातील २ लाख ३१ हजार ५२८ रुग्ण हे लक्षण नसलेले, सौम्य लक्षणांसह बरे होण्याच्या मार्गावर आहेत. हे प्रमाण ९१ टक्के आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग झाला, तरी तो नियंत्रणात येऊ शकतो, हा दिलासा मिळाला आहे.
निवासस्थानीच विलगीकरणाचा सल्ला
मागील काही दिवसांमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या किंवा पॉझिटिव्ह असूनही कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हे रुग्ण संसर्ग पसरविण्यासाठी सक्रिय असतात का, यावरही ठोस अभ्यास सुरू असून, हे रुग्ण काही प्रमाणात संसर्ग पसरवू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या घरी संबंधित सुविधा असल्यास निवासस्थानीच विलग राहण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.