आई ती आईच! फुफ्फुसात १०० टक्के संसर्ग झालेल्या कोरोनाबाधित मातेने दिला बाळाला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 08:41 AM2021-05-22T08:41:44+5:302021-05-22T08:43:36+5:30
मांडीवर ठेऊन डॉक्टरांनी तिचे वाढवले मनोबल
बारामती (पुणे) : शेवटी ‘आई ती आईच’ असते. तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आईची व्याख्या अधोरेखित करणारी अनोखी घटना बारामतीत घडली आहे. फुफ्फुसात १०० टक्के संसर्ग झालेल्या कोरोनाबाधित गर्भवती महिलेने तत्पर उपचार आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर बाळाला सुखरूप जन्म दिला आहे. डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर असलेल्या या मातेच्या मांडीवर नवजात बालकाला ठेवत तिचे मनोबल वाढविले.
बारामती येथील मेहता हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या पथकाने ही किमया साधली आहे. ६ एप्रिल रोजी गरोदर २८ वर्षीय महिला रुग्णालयात दाखल झाली. ती मूळची देऊळगाव राजे येथील शेतकरी कुटुंबातील असून तिला ३ वर्षांची एक मुलगी आहे. तिचे संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित होते. तिला दाखल करताना कोविडमुळे ताप, खोकला, धाप लागणे असा त्रास होता. ऑक्सिजन पातळी ९० ते ९२ दरम्यान होती. दोन- तीन दिवसांनी ऑक्सिजन पातळी आणखी खालावली. उपचारादरम्यान तिला ऑक्सिजनची गरज भासू लागली. १० एप्रिल रोजी ती अत्यवस्थ झाली. तिला व्हेंंटिलेटरवर घेण्याची वेळ आली. महिलेचा एचआरसीटी स्कोअर २५ असल्याने अतिशय नाजूक अवस्था होती. रक्ताचा अहवालही चांगला नव्हता. त्यातच तिला प्रसूतिकळा सुरू झाल्या.
आधीचे सिझर असल्याने आतादेखील सिझरच करणे गरजेचे होते. ती व्हेंटिलेटरवर असतानाही डॉक्टरांनी निर्णय घेत कोरोना संसर्गाचा धोका पत्करून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली. तिची सुखरूप प्रसुती झाली आणि तिने सुदृढ मुलीला जन्म दिला.
त्याची चाचणी आली निगेटिव्ह
बाळाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या बाळाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. यानंतर ती महिला पुढील १३ दिवस व्हेंंटिलेटरवर अतिदक्षता विभागात अत्यवस्थ होती. या दरम्यान तिचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ती व्हेंटिलेटरवर असताना तिच्या मांडीवर बाळ दिले. यामुळे रुग्णाची जगण्याची इच्छा प्रबळ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
४५ दिवसांच्या उपचारानंतर ती महिला कोरोनामुक्त होऊन प्रकृती चांगली झाली आहे. बाळही सुखरूप आहे. - डॉ. विशाल मेहता