Coronavirus: कोरोना संकटकाळात दोन चिमुरडे खासदार सुनील तटकरे यांच्या घरची वाट अडवतात तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 10:13 AM2020-04-25T10:13:56+5:302020-04-25T10:17:13+5:30
लोकांमध्ये फिरून लोकप्रतिनिधींनाही त्यांच्या घरची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी लागते.
मुंबई – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरस संकटाने संपूर्ण जगासमोर आव्हान उभं केलं आहे. आतापर्यंत जगभरात २८ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १ लाख ९० हजारांहून जास्त मृत्यू झालेत. तर देशातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात २४ हजारांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ७०० पेक्षा अधिक मृत्यू झालेत.
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी बहुतांश देशांनी लॉकडाऊन केलं आहे. राज्यातही कोरोनाविरुद्ध युद्ध सुरु आहे. कोरोनाच्या या लढाईत जिंकण्यासाठी प्रशासनाने लोकांना घराबाहेर पडू नका असं आवाहन करत आहेत. मात्र या संघर्षकाळात अत्यावश्यक सेवा देणारे आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार, पोलीस लोकांची सेवा करत आहे. त्यातच या संघर्षकाळात लोकांच्या मदतीला स्थानिक लोकप्रतिनिधीही धावून जात आहे.
लोकांमध्ये फिरून लोकप्रतिनिधींनाही त्यांच्या घरची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी लागते. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी एक असाच व्हिडीओ ट्विटरवर अपलोड केला आहे. रोहा सुतारवाडी येथे त्यांच्या निवासस्थानी प्रवेश करताना या दोन चिमुरड्यांनी त्यांची वाट अडवली. खासदार सुनील तटकरे बाहेरून आल्यानंतर त्यांच्या घरातील कोविड पोलीस कशाप्रकारे त्यांची काळजी घेतात हे दिसत आहे. अर्थात हे कोविड पोलीस म्हणजे खासदार सुनील तटकरे यांची नातवंडे आहेत. आमदार अनिल तटकरे यांचे चिरंजीव आर्यव्रत आणि अधिराज कुटुंबातील सदस्यांनी काळजी घेताना दिसत आहे.
अनिल तटकरे यांनी हा व्हिडीओ अपलोड करताना लिहिलं आहे की, आमच्या घरातल्या मुलांनी कोरोनाविरोधात मोहिम हाती घेतली आहे. सॅनिटायझेशन केल्याशिवाय अगदी कोणीही घरात येणार नाही याची ते पुरेपूर काळजी घेतायत. त्यांच्या निरागसपणे केलेल्या कृतीत मोठा संदेश आहे. योग्य खबरदारी घ्यायला हवी. कोरोनाविरुद्ध विरोधात लहान-मोठे सगळ्यांनीच लढा द्यायचा आहे असं त्यांनी सांगितले
सतत लाड करून घेणारी ही माझी नातवंडं #सॅनिटायझेशन करण्यासाठी जेव्हा हक्काने वाट अडवतात तेव्हा आनंद आणि समाधान वाटतं. या वयातही त्यांना करोनाच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात येत आहे, हे कौतुकास्पद आहे. अशाप्रकारची जागृती देशातील प्रत्येक घरात होणे आवश्यक आहे. #coronavirushttps://t.co/voDEA2WRLy
— Sunil Tatkare (@SunilTatkare) April 23, 2020
तर सतत लाड करून घेणारी ही माझी नातवंडं सॅनिटायझेशन करण्यासाठी जेव्हा हक्काने वाट अडवतात तेव्हा आनंद आणि समाधान वाटतं. या वयातही त्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात येत आहे, हे कौतुकास्पद आहे. अशाप्रकारची जागृती देशातील प्रत्येक घरात होणे आवश्यक आहे असं आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे.