coronavirus: एमपीएससीच्या प्रलंबित परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध, या तारखांना होतील परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 04:21 PM2020-06-17T16:21:02+5:302020-06-17T16:21:15+5:30
आता हळूहळू लॉकडाऊन हटवण्यास सुरुवात झाल्यानंतर आता एमपीएससीकडून प्रलंबित परीक्षांचे वेळापत्रक आज प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शालेय, माध्यमिक आणि इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा लांबणीवर टाकाव्या लागल्या आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या नियोजित असलेल्या परीक्षाही कोरोनामुळे लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. आता हळूहळू लॉकडाऊन हटवण्यास सुरुवात झाल्यानंतर आता एमपीएससीकडून प्रलंबित परीक्षांचे वेळापत्रक आज प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या वेळापत्रकाप्रमाणे राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही १३ सप्टेंबर २०२० रोजी होईल. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० ही ११ ऑक्टोबर २०२० रोजी होईल. तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही परीक्षा एक नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात येईल.
दरम्यान, आज वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असले तरी, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत शासनाकडून वेळोवेळी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि लॉकडाऊनचा कालावधी विचारात घेऊन एमपीएससीकडून वेळोवेळी फेरआढावा घेण्यात येईल, तसेच यासंदर्भातील माहिती एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, त्यासाठी परीक्षार्थींनी संकेतस्थळावरून नियमितपणे माहिती घ्यावी, असे आवाहन एमपीएससीकडून करण्यात आले आहे.
एमपीएससीकडून प्रसिद्ध करण्यात आलेले परीक्षेचे वेळापत्रक