CoronaVirus जसलोक रुग्णालयाच्या नर्सला कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 10:21 PM2020-03-31T22:21:44+5:302020-03-31T22:24:11+5:30
अन्य आजारासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र काही दिवसानंतर कोरोनाची लक्षणे रुग्णामध्ये आढळली.
मुंबई : जसलोक रुग्णालयाच्या परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
प्रवासाचा इतिहास नसणाऱ्या ही रुग्ण अन्य आजारासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र काही दिवसानंतर कोरोनाची लक्षणे रुग्णामध्ये आढळली. त्यानंतर त्वरित तिला कोरोनाच्या कक्षात हलविण्यात आले. रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या सर्वांचे स्क्रिनिंग कऱण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्यांना अलगीकऱणाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हा संसर्ग पसरणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे, असे जसलोक रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णालये, सुश्रुषा केंद्रांनी कशा प्रकारे कार्यरत रहावे याबाबत राज्य शासनाने नियमावली तयार केली आहे. अशा खासगी रुग्णालयांमध्ये संशयित कोरोना (कोविड-१९) रुग्ण आल्यास इंडियन कौन्सिल फॉर मेडीकल रिसर्च या संस्थेने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोविड-१९ च्या उपचार करणाऱ्या शासकीय वा अन्य रुग्णालयांमध्ये संबंधित संशयित रुग्णास तत्काळ दाखल करावे. खासगी रुग्णालये नजिकच्या कोविड-१९ रुग्णालयाशी संपर्क साधून संबंधित संशयित रुग्णासाठी बेड आणि रुग्णवाहिका उपलब्ध आहेत का, याची खात्री करुन घेतील. सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामार्फत पुरविण्यात आलेल्या, १०८-रुग्णवाहिकेमधून किंवा कोविड-१९ रुग्णवाहिकेमधूनच संबंधित रुग्णाला पाठविण्यात यावे. दोन्ही संचालनालयामार्फत प्रत्येक कोविड-१९ रुग्णालयात, १०८-रुग्णवाहिका पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतील याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे. भारत सरकारने आखून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार संशयित रुग्णाला पाठविण्यात यावे. नजिकच्या कोविड-१९ रुग्णालयात बेड आणि रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास त्यानंतरच्या नजिकच्या कोविड-१९ रुग्णालयाकडे या रुग्णाला पाठविण्यासंदर्भात विचारणा करण्यात यावी.
खासगी रुग्णालयात कोविड-१९ च्या रुग्णांवर उपचार होत नाहीत, त्यांनी त्यांच्या परिसरातील कोविड-१९ च्या रुग्णांचा उपचार करणाऱ्या रुग्णालयांची माहिती करुन घेतल्याची खात्री सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी करुन घ्यावी. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालकांनी कोविड-१९ च्या रुग्णांवर उपचार करणाऱ्यात येणाऱ्या सर्व अशासकीय रुग्णालय व केंद्रांची यादी तयार करावी. संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांची यादी तयार करावी, तसेच ही यादी सर्व रुग्णालयांकडे पाठविण्यात यावी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर लावण्यात यावी.