CoronaVirus News: कोरोनाकाळात वनविभागातील १५० कर्मचाऱ्यांचा मृत्यू; लसीकरणाला प्राधान्य नाही, फ्रंटलाईन वर्करची मान्यताही नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 08:39 AM2021-05-31T08:39:45+5:302021-05-31T08:40:04+5:30
CoronaVirus News: अलीकडे ग्रामीण भागामध्ये कोरोना संक्रमण वेगाने वाढत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही धोका अधिक वाढला आहे.
नागपूर : कोरोना काळात १५ मेपर्यंत १५० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या कठीण काळातही वन आणि वन्यजीवांचे रक्षण करताना अनेकांनी जोखीम उचलली. तरीही या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून सरकारने मान्यता दिलेली नाही. लसीकरणालाही प्राधान्य दिले नाही. त्यामुळे आतातरी दखल घ्यावी, अशी अपेक्षा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जी. साईप्रकाश यांनी प्रधान सचिवांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.
वन्यजीवांच्या रक्षणाचे काम करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फिल्ड वर्कमुळे नागरिकांशी संपर्क येतो. अलीकडे ग्रामीण भागामध्ये कोरोना संक्रमण वेगाने वाढत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही धोका अधिक वाढला आहे. मागील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनामुळे १५ मेपर्यत १५० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यात १३० क्षेत्रीय व २० कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनाही फ्रंटलाईन वर्कर जाहीर करून त्यांच्या लसीकरणाची प्राधान्याने व्यवस्था करावी, अशी मागणी वनबल प्रमुखांनी केली आहे.
वनविभागातील कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित न केल्याने अखेर या कामी पेंच फाऊंडेशनने पुढाकार घेतला होता. फाऊंडेशनने निधी देऊन एप्रिल महिन्यात लसी खरेदी केल्या होत्या. त्यातून १५ ते ३० टक्के म्हणजे जवळपास ३५० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले होते. लसीकरणासाठी पेंच प्रकल्पाने जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र लिहून विनंती केली होती. मात्र दखल न घेतल्याने अखेर हा निर्णय घ्यावा लागला होता.
वनविभागातील कोरोनाचे मृत्यू
विभागीय वनाधिकारी : २
सहायक वनसंरक्षक : २
वनपरिक्षेत्र अधिकारी : ४
वनपाल : २४
वनरक्षक : ३३
मजूर : ६५
कार्यालय अधीक्षक : ३
लेखापाल : ५
nलिपीक : ६
nवाहन चालक : ३
इलेक्ट्रिशियन, मेस सर्व्हंट, शिपाई : ३