CoronaVirus News : राज्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल २२ हजार ५४३ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 04:10 AM2020-09-14T04:10:57+5:302020-09-14T04:11:23+5:30
देशात सक्रिय रुग्णसंख्या सर्वाधिक असणाऱ्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र असून, सध्या २ लाख ९० हजार ३४४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुंबई : राज्यात रविवारी दिवसभरात कोरोनाच्या २२ हजार ५४३ रुग्णांचे निदान झाले, तर तब्बल ४१६ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांची संख्या १० लाख ६० हजार ३०८ वर पोहोचली असून, मृतांचा आकडा २९,५३१ वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात घट होत असून, सध्या हे प्रमाण ६९.८ टक्के आहे, तर मृत्युदर २.७९ टक्के आहे.
देशात सक्रिय रुग्णसंख्या सर्वाधिक असणाऱ्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र असून, सध्या २ लाख ९० हजार ३४४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरातील ४१६ मृत्यूंमध्ये मुंबईत ४१, ठाणे १, ठाणे मनपा ११, नवी मुंबई ७, कल्याण-डोंबिवली मनपा ४, उल्हासनगर २, मीरा-भार्इंदर ३, पालघर ३, वसई-विरार ६ आदी रुग्णांचा समावेश आहे.
दिवसभरात ११,५४९ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ७ लाख ४० हजार ६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात पुण्यात सर्वाधिक ७७,६२४ सक्रिय रुग्ण आहेत. त्या खालोखाल मुंबईत ३०,३१६, ठाणे २९,५३१, नागपूर २१,५२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
लक्षणे नसलेले रुग्ण घरीच क्वारंटाइन-पालिकेचा निर्णय
ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत, त्यांना घरीच क्वारंटाइन करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या संदर्भात पालिकेने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार, मुंबई महापालिकेच्या वॉर्ड स्तरावरील वॉर्ड रूममधील तज्ज्ञ अशा घरीच क्वारंटाइन केलेल्या रुग्णांच्या फॅमिली डॉक्टरांच्या संपर्कात राहणार असून, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतील.