CoronaVirus News: तिसऱ्या लाटेत राज्यात किती जणांना होऊ शकते कोरोनाची बाधा? मंत्र्यांनी सांगितला भीतीदायक आकडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 09:29 IST2021-06-26T09:26:46+5:302021-06-26T09:29:10+5:30
CoronaVirus News: लवकरच कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती; परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू

CoronaVirus News: तिसऱ्या लाटेत राज्यात किती जणांना होऊ शकते कोरोनाची बाधा? मंत्र्यांनी सांगितला भीतीदायक आकडा
मुंबई: राज्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यातच देशात डेल्टा प्लसचे ४८ रुग्ण आढळले असून त्यातील २० रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत राज्यातील ५० लाख लोकांना लागण होईल आणि यातील ५ लाख लहान मुलं असतील, असा धोक्याचा इशारा राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.
बुलढाण्यात पत्रकारांशी संवाद साधत असताना राजेंद्र शिंगणे यांनी कोरोना संकट आणि तिसऱ्या लाटेबद्दल भाष्य केलं. 'तिसरी लाट टोक गाठेल, तेव्हा ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ लाखांच्या घरात असेल. जवळपास ५ लाख मुलांना कोरोनाची लागण होईल. यापैकी २.५० लाख मुलांना रुग्णालयात दाखल करावं लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत याबद्दल चर्चा झाली आहे,' अशी माहिती शिंगणे यांनी दिली.
तिसऱ्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आरोग्यविषयक सेवा सुविधा वाढवण्याचं, औषधांचा साठा करण्याचं, आरोग्य कर्मचाऱ्यांना सज्ज ठेवण्याचं काम सुरू आहे. तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना असलेला धोका पाहता बालरोगतज्ज्ञांची फळीदेखील सुसज्ज ठेवण्यात येत आहे, असं शिंगणे यांनी पुढे सांगितलं.
डेल्टा प्लसचा धोका वाढल्यानं पहिला, दुसरा स्तर रद्द
कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटनुसार निश्चित करण्यात आलेले एक आणि दोन स्तर रद्द करून आता केवळ तीन, चार आणि पाच असे तीनच स्तर ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने शुक्रवारी घेतला. आजच्या निर्णयामुळे ३३ जिल्ह्यांमध्ये स्तर तीनचे निर्बंध लागू झाले आहेत.
आतापर्यंत एक आणि दोन स्तरांत असलेल्या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या स्तरातील निर्बंध राहतील. गेल्या आठवड्यात राज्यातील २५ जिल्हे हे स्तर एकमध्ये होते. याशिवाय आठ जिल्हे आधीपासूनच स्तर तीनमध्ये होते. आता या सर्व जिल्ह्यांमध्ये स्तर तीनमधील निर्बंध असतील. डेल्टा व्हेरिएंटचा शिरकाव आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी शिथिलता मिळवायची असेल तर एक आठवड्याचा कमी होणारा पॉझिटिव्हिटी रेट बघायचे. आता तो दोन आठवड्यांचा बघितला जाईल. अधिक निर्बंध लावायचे असतील तर मात्र दोन आठवडे वाट बघण्याची गरज नसेल. जिल्हा प्रशासन गरजेनुसार निर्णय घेऊ शकेल.