CoronaVirus News: दिलासादायक! डेल्टा प्लस, तिसऱ्या लाटेचा धोका असताना महाराष्ट्रासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 09:25 AM2021-08-10T09:25:18+5:302021-08-10T09:45:44+5:30
राज्यात १०० पैकी ८० रुग्ण आढळले डेल्टाचे, डेल्टा प्लसचे प्रमाण नगण्य; मास्क, सुरक्षित अंतराला पर्याय नाही - तज्ज्ञांचे मत
- अतुल कुलकर्णी
मुंबई : राज्यात १२ जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे ४५ रुग्ण आढळून आले असले तरी घाबरून जाण्याची परिस्थिती नाही. आपल्याकडे प्रत्येक १०० रुग्णांमागे ८० रुग्णांमध्ये डेल्टाचे विषाणू आढळत आहेत. तर प्रत्येक १०० रुग्णांमागे ०.५ रुग्णांमध्ये डेल्टा प्लसचे विषाणू आढळून आले आहेत. ८००० तपासण्यांमधून हा निष्कर्ष समोर आला आहे. यासाठी आज तरी मास्क आणि सुरक्षित अंतर याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
राज्यात जळगाव १३, रत्नागिरी ११, मुंबई ६, ठाणे ५, पुणे ३, पालघर, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, कोल्हापूर, बीड या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एक असे ४५ रुग्ण डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आढळून आले आहेत. त्यापैकी रत्नागिरीमधील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बाकी रुग्णांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. डेल्टा प्लस विषाणूची तपासणी मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. तरच या नव्या विषाणूचे किती रुग्ण कोणत्या जिल्ह्यात आहे ते स्पष्ट होईल, असेही या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, विषाणूमध्ये जनुकीय बदल होणे हा नैसर्गिक भाग आहे. असे बदल झाले नाहीत तर ते जास्त धोकादायक असते. डेल्टा प्लस रुग्णांमुळे या आजाराच्या प्रसाराचा वेग वाढतो. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर ज्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती तयार झाली आहे, त्यालाही न जुमानता हा विषाणू अशा रुग्णांमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. ही याची प्राथमिक लक्षणे समोर आली आहेत. आपल्याकडे सॅम्पल साइज छोटा असल्यामुळे जी माहिती हाताशी आहे, त्यावरून आजतरी डेल्टा प्लस फारसा गंभीर नाही, असे आपण म्हणू शकतो. मात्र हा आजार कितपत गंभीर आहे यासाठी साथरोग शास्त्रीय माहिती गोळा करणे सुरू आहे, असे डॉ. आवटे यांनी सांगितले.
रत्नागिरीत ज्या महिलेचा मृत्यू झाला, ती मनोरुग्ण होती. त्यामुळे ती उपचाराला सहकार्य करू शकली नाही. बाकी रुग्ण सौम्य व मध्यम स्वरूपाच्या आजाराचे आहेत, असे सांगून डॉ. आवटे म्हणाले, डेल्टा प्लस रुग्ण ज्या भागात आढळले आहेत, त्या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे, किंवा संसर्ग वाढण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही आढळलेले नाही. त्यामुळे डेल्टा प्लसच्या प्रसाराचा वेग जास्त आहे, असा निष्कर्ष आज अपुऱ्या माहितीवर काढता येणार नाही. घाबरून न जाता, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे, स्वतःची काळजी घेणे, हेच यावरचे उपचार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले, डेल्टा प्लस रुग्णांची झालेली तपासणी मर्यादित आहे. आणखी जास्त तपासण्या सुरू आहेत. त्यामुळे आत्ताच कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. याबाबत आणखी मोठ्या प्रमाणावर तपासणी करावी लागेल.
तपासणीसाठी सेंटिनल सर्वेक्षण
राज्यातील ५ प्रयोगशाळा आणि ५ रुग्णालयाची निवड यासाठी सेंटिनल सेंटर म्हणून करण्यात आली आहे. हे सेंटर दर १५ दिवसाला १५ प्रयोगशालेय नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था पुणे, यांना पाठवत आहे.
राज्य शासनाने यासाठी कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स ॲण्ड इंटिग्रेटेड बायोलॉजी या प्रयोगशाळेसोबत करार केला आहे.
या माध्यमातून दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यातून १०० प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
सर्वाधिक १९ ते ४५ वर्षे वयोगटातील
४५ रुग्णांपैकी २७ पुरुष व १८ स्त्रिया आहेत. सर्वाधिक २० डेल्टा प्लस रुग्ण १९ ते ४५ वर्षे वयोगटातील आहेत. तर ४६ ते ६० वर्षे वयोगटातील १४ रुग्ण आहेत. यामध्ये १८ वर्षाखालील ६ मुलांचा समावेश असून ६० वर्षावरील ५ रुग्ण आहेत. ४५ रुग्णांपैकी ३४ रुग्णांची सविस्तर माहिती आतापर्यंत गोळा झाली आहे.