CoronaVirus News: अकोल्यात ८२ वर्षीय आजोबांनी घाबरून न जाता जिद्दीने कोरोनाला केले चितपट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 09:38 AM2021-06-01T09:38:20+5:302021-06-01T09:38:54+5:30
जगण्याची तीव्र इच्छा; डॉक्टरांचे परिश्रम, कुटुंबाने दिलेली हिंमत फळाला
- रवी दामोदर
अकोला : जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील कार्ला येथील एका ८२ वर्षीय आजोबांनी हिंमत, जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनाला चितपट केले. या उतारवयात त्यांनी कोरोनावर मात केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
जगण्याची तीव्र इच्छा, डॉक्टरांचे परिश्रम आणि कुटुंबाने दिलेल्या हिमतीच्या बळावर कोरोनाला मात देणाऱ्या या आजोबांचे नाव आहे लक्ष्मण घायवट. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत गावा-गावात कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागात या शिबिरांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. असे असतानाही गावातून कोरोना हद्दपार व्हावा, या दृष्टिकोनातून गावात जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोनाची चाचणी करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन कोरोनाची लक्षणे नसतानाही ८२ वर्षीय लक्ष्मणराव यांनी गावात आयोजित शिबिरात कोरोनाची चाचणी केली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे नातेवाईक घाबरले; मात्र आजोबांनी घाबरून न जाता कोरोनाला चितपट देण्याची खूणगाठ तेथेच बांधली व ही लढाई जिंकलीही.
‘जो डर गया, समझो मर गया!’
अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नातेवाईकांसह कुटुंबातील सदस्यांच्या मनात भीती दाटली होती; मात्र लक्ष्मणराव यांनीच कुटुंबातील सदस्यांना धीर दिला. कुटुंबातील सदस्य, त्यांचा मुलगा रवी व सून वैशाखी यांनी कोरोना नियमांचे पालन करीत त्यांची योग्य काळजी घेतली. एव्हाने कुटुंबीयांनीही त्यांना सतत हिंमत दिली. कोरोनाला हरवायचे असेल, तर मनातून भीती जाणे गरजेचे आहे, असे लक्ष्मणराव यांनी सांगितले.
आरोग्य विभागाचा होता ‘वाॅच’!
लक्ष्मणराव यांना सौम्य लक्षणे असल्याने गृह विलगीकरणात ठेवण्यात आले. आलेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टरही त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. गावातील वैद्यकीय अधिकारी व आशा सेविकेमार्फत दररोज आजोबांची ऑक्सिजन लेव्हल, ताप मोजण्यात येत होता. डॉक्टरांच्या परिश्रमाने कोरोनाला हरवणे सोपे गेल्याचे घायवट म्हणाले.