CoronaVirus News : साखर कारखानदारांना कोविड हॉस्पिटल उभारायला सांगा - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 07:25 PM2020-08-09T19:25:25+5:302020-08-09T19:26:17+5:30
कऱ्हाड येथे रविवारी सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची आढावा बैठक झाली.
- प्रमोद सुकरे
कऱ्हाड : ‘कोरोना महामारी संकटाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. रुग्णसेवेसाठी हॉस्पिटल वाढविण्याची गरज आहे. ती गरज लक्षात घेऊन सहकारी साखर कारखानदारांना कोविड हॉस्पिटल त्वरित उभारायला सांगा. साखर सचिवांना सांगून याबाबतचे परिपत्रक जारी करा,’ अशा सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना केल्या.
कऱ्हाड येथे रविवारी सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची आढावा बैठक झाली. त्या बैठकीदरम्यान शरद पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना वरील सूचना केली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सतेज पाटील यांची उपस्थिती होती.
शरद पवार व्यासपीठावर असणाऱ्या साखर कारखानदारांकडे पाहूनच म्हणाले की, ‘कारखानदारांना हॉस्पिटल उभारणे काही अवघड बाब नाही. त्यांनी मनात घेतले, अद्ययावत हॉस्पिटल उभारली तर रुग्णांना चांगली सुविधा मिळणे सोपे होईल. जे साखर कारखाने बंद आहेत. त्या कारखान्यांची रिकामी गोडावून उभारलेली मोठी पत्र्याची शेडसुद्धा ताब्यात घेऊन ठेवली पाहिजेत. तेथे सुद्धा कोरोना क्वॉरंटाईन सेंटर उभारता येतील. याबाबत त्वरित योग्य ती कार्यवाही करावी.’
मी अजूनही चेअरमन आहे
कारखानदारांनी हॉस्पिटल उभारावीत ही सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना करताना शरद पवार यांनी ‘बाळासाहेब तुम्ही सद्धा एका कारखान्याचे चेअरमन होता’ असा उल्लेख केला. त्यावर ‘साहेब मी अजूनही चेअरमन आहे,’ असे बाळासाहेबांनी सांगताच बैठकीत खसखस पिकली.