CoronaVirus News : सीईटीच्या तारखा पुढे ढकलल्या; प्रवेशही लांबणीवर पडण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 06:18 AM2020-06-23T06:18:06+5:302020-06-23T06:18:27+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या सर्व प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी सांगितले.
मुंबई : उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षा आधी जुलै महिन्यात होणार होत्या. त्यानुसार महाराष्ट्र सीईटी सेलने राज्य सामायिक प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) तारखाही जाहीर केल्या होत्या. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या सर्व प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी सांगितले.
यंदा यासाठी ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ठरलेल्या तारखांनुसार प्रवेशपत्रांसह सर्व तयारी केली होती. यंदा प्रथमच पीसीबी आणि पीसीएम या गटांतच या परीक्षा होणार होत्या. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्याऐवजी तालुका स्तरावर केंद्रे स्थापन केली होती. अनेक विद्यार्थी मूळ गावी गेल्याने त्यांना केंद्र बदलण्याची मुभाही होती. तब्ब्ल ५९ हजार विद्यार्थ्यांनी केंद्र बदलून घेतले.
>शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाचे आव्हान
परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्र्थ्यांना आणखी वाट पाहावी लागेल. त्यांच्या पदवी महाविद्यालयांचे प्रवेशही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पदवी प्रवेशनानंतर शैक्षणिक वर्षाचे नियोजन उच्च व तंत्रशिक्षण विभाग कसे करणार, हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे