CoronaVirus News : पावसाळ्यापूर्वी कोरोनाचे संकट संपवण्याचा निर्धार- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 05:23 AM2020-05-19T05:23:45+5:302020-05-19T06:04:59+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : नवे उद्योगपर्व सुरू करण्याचा तसेच पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचे संकट संपविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मुंबई : महाराष्ट्रात नवीन उद्योग उभारण्यासाठी भाडेतत्त्वावर जमिनी देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. कोणत्याही 'अटी'तटीचा सामना न करता परवानगीशिवाय हे उद्योग सुरू करता येतील असे त्यांनी जाहीर केले. नवे उद्योगपर्व सुरू करण्याचा तसेच पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचे संकट संपविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील जनतेशी संवाद साधताना त्यांनी नवीन उद्योगांसाठी ४० हजार एकर जमीन राखून ठेवण्यात आली असल्याचे सांगितले. नवीन उद्योग जर प्रदूषणमुक्त असतील तर त्यांच्यासाठी कुठल्याही अटी नसतील असे ते म्हणाले. सध्याच्या आर्थिक संकटात उद्योगांसाठी जमिनी खरेदी करण्याऐवजी त्या भाडेतत्त्वावर देण्याचा पर्याय मुख्यमंत्र्यांनी देशाबाहेरील तसेच देशांतर्गत उद्योगांना दिला. राज्याचे अर्थचक्र गतिमान करण्यासाठी आणखी काही निर्णय घेण्यात येतील असे संकेत त्यांनी दिले. नवीन शैक्षणिक सत्र राज्यात सुरळीत सुरू करायचे आहे. त्यादृष्टीने तुम्हा सर्वांच्या सहकायार्ने कोरोनाचे संकट संपवणार असे ते म्हणाले
परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात निघून गेला आहे. दुसरीकडे ग्रीन झोनमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू झालेले आहे ७० हजार उद्योग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असून प्रत्यक्ष ५० हजार उद्योग सुरू झाले आहेत. अशा उद्योगांना आज कामगारांची गरज आहे अशावेळी भूमिपुत्रांनी या उद्योगांमध्ये नोकऱ्या कराव्यात. त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. संकटाला सामोरे जाताना मदार्सारखा लढणारा शिवरायांचा महाराष्ट्र स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभा राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लॉकडाऊनबाबत ते म्हणाले की ग्रीन झोनमध्ये बहुतेक गोष्टी शिथिल केल्या आहेत. आॅरेंजमध्येही त्या टप्प्याटप्प्याने करू. रेड झोनमध्ये तसे करणे शक्य होणार नाही. वेळोवेळी शिथिलतेबाबत पूर्वकल्पना दिली जाईल.अचानक निर्णय घेतला जाणार नाही. लॉकडाऊनचे कडक पालन करून आपण आतापर्यंत कोरोनाचा वेगाने होणारा गुणाकार रोखला आहे असे ते म्हणाले.' घरात राहा, सुरक्षित राहा,घराबाहेर राहताना सावध राहा असे आवाहनही त्यांनी केले.
परप्रांतीय मजुरांनी पायी जाण्याची गरज नाही त्यांच्यासाठी रेल्वेगाड्यांची तसेच बसेसची व्यवस्था केली आहे
कोकणवासियांना आवाहन
मुंबईतून कोकण,प. महाराष्ट्रात गावी जाण्याची अनेकांची इच्छा आहे पण खरेच जाणे गरजेचे आहे का याचा विचार करा, आपल्यामुळे आपल्या गावी असलेल्या आप्तेष्टांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्या. गावी जाण्याची घाई न करणे हे आपल्या आप्तेष्टांवर व राज्यावर आपले उपकार असतील. रस्त्याने चालत जाण्याची काहीही गरज नाही. योग्यवेळी आपल्याला गावी पोहोचवण्यासाठी निर्णय घेतला जाईल, तूर्त अधीर होऊ नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राज्यात जे ग्रीन झोन आहेत ते तसेच राहावेत हे अत्यंत महत्वाचे आहे असे ते म्हणाले.
मुंबईत व्यापक तयारी
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबईत व्यापक तयारी केली आहे.बीकेसीमध्ये आणखी हजार बेडचे कोविड सेंटर उभारले जाईल. गोरेगाव एक्झिबिशन सेंटर, रेसकोर्स, वरळी डोम येथेही सुसज्ज कोविड सेंटर आहेत. पुढे किती रुग्ण वाढणार आहेत याचा अंदाज घेऊन सर्व व्यवस्था उभारली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली