CoronaVirus News: 'त्याला काय होतंय...' या वृत्तीनेच घात केला; सातारा, सांगली, कोल्हापुरात कोरोना वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 10:07 AM2021-06-04T10:07:34+5:302021-06-04T10:11:07+5:30
सातारा, सांगली, कोल्हापुरात म्हणूनच वाढला कोरोना; पुणे-मुंबईकरांचा राबता बाधला
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा पश्चिम महाराष्ट्राला बसला. त्यातही सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वाढता संसर्ग कमी होण्याचे नाव घेत नसल्याने प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आजही हे तीनही जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. या दुरवस्थेच्या अनेक कारणांपैकी निर्बंधांना झुगारून पुण्या-मुंबईहून दाखल झालेली गर्दी हे एक प्रमुख कारण असल्याच्या चर्चेने आता जोर धरला आहे. १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर उन्हाळ्याची सुटी गावीच घालवण्याच्या इराद्याने खासगी ट्रॅव्हल्स, जीप, अगदी रिक्षानेसुद्धा कुटुंबे आली आणि संसर्ग वाढत गेला.
सातारा- पाहुण्यांची गर्दी
सातारा : कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरक्षित असलेला ग्रामीण भाग दुसऱ्या लाटेत मात्र अक्षरश: पिळवटून निघाला. मुंबई-पुण्याहून खासगी ट्रॅव्हल्स तुडुंब भरून रातोरात ग्रामीण भागात येत आहेत. यातील एकाही प्रवाशाची प्रशासनाकडे नोंद नाही, ना त्यांची चाचणी केली गेली. निर्बंध झुगारून परजिल्ह्यातून आलेल्यांचा संसर्ग वाढण्याला मोठा हातभार लागत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्यांना कोणीही ई-पास मागत नाही की, तुम्हाला परवानगी आहे का, याची विचारणा करत नाही. याचे आश्चर्य गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. दुसऱ्या लाटेत गावपातळीवरील समित्याही कार्यरत नव्हत्या. त्यामुळे अशा लोकांना आणखी मोकळे रान मिळाले.
गतवर्षी ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा फैलाव फारसा नव्हता. पुणे- मुंबईहून आलेल्या प्रवाशांमुळे यावेळी संसर्ग वाढला. त्यांना गतवर्षीसारखे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले नव्हते. याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.
-उत्तम वाघ, रा. तारळे, जि. सातारा
गतवर्षी गावामध्ये बांबू आडवे लावून वाहतूक अडवण्यात आली होती; पण यंदा असे काहीच केले नाही. त्यामुळे पुणे- मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त होती.
-संदीप साळुंखे, रा. कडवे बुद्रुक, ता. पाटण, जि. सातारा
कोल्हापूर- गृह विलगीकरण महागात
कोल्हापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी जितके गांभीर्य गावागावात पाळले गेले, तेवढे गांभीर्य दुसऱ्या लाटेवेळी पाळले गेले नाही हे वास्तव आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्यासाठी गृह विलगीकरण नसणे हे महत्त्वाचे कारण ठरले आहे.
पुणे, मुंबईसह बाहेरच्या शहरांतून आलेले नागरिक थेट घरातच राहिले. त्यांच्या कोणत्याही चाचण्या झाल्या नाहीत. मे महिन्यात जिल्ह्यात ५० हजार नागरिक पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये गृहीत धरलेल्या गावातील संख्या अधिक आहे. कारण पॉझिटिव्ह रुग्ण घरात राहिल्यानंतर शिस्त पाळली गेली नाही. ते घरातीलच इतरांच्या संपर्कामध्ये आले आणि घरचे बाहेर फिरत राहिले. परिणामी संख्या वाढतच राहिली. प्रभाग समित्या, ग्राम समित्यांनीही प्रभावीपणे काम केले नाही.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीसाठी गृह विलगीकरण हे अनेक कारणांपैकी एक कारण आहे. त्यामुळे जिल्ह्यात शक्यतो संस्थात्मक विलगीकरणाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. उषादेवी कुंभार, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, कोल्हापूर जिल्हा परिषद
सांगली- तेच सुपर स्प्रेडर
सांगली : सांगली जिल्ह्याला कोरोनाची दुसरी लाट तुलनेने फारच महाग ठरली आहे. गृह विलगीकरणाविषयी बेफिकिरी आणि परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांचे बिनधास्त फिरणे नडल्याने पाहता पाहता जिल्हा रेड झोनमध्ये जाऊन बसला. दुसऱ्या लाटेत संस्थात्मक विलगीकरण गांभीर्याने राबवले गेले नाही. गृह विलगीकरणामध्येच रुग्ण राहिले. त्यांच्यावर कुणाचाच वॉच नसल्याने नियम झुगारून बिनधास्त रस्त्यावर येत राहिले आणि इतरांसाठी ते सुपर स्प्रेडर ठरले.
सातारा जिल्ह्यात येणाऱ्या लक्झरी बसवर कारवाई करण्यासाठी रात्री काम करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने महिन्यात २४ लक्झरी बसवर कारवाई केली आहे. अद्यापही कारवाईची मोहीम सुरू आहे.
- विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा.