CoronaVirus News : राज्यात केवळ पाच टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 04:43 AM2020-06-23T04:43:30+5:302020-06-23T04:43:54+5:30
CoronaVirus News : राज्यात ३९ टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. तर राज्यात ५० टक्के रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र राज्यातील केवळ पाच टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याचे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संचालनालयाच्या अहवालात म्हटले आहे. याशिवाय राज्यात ३९ टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. तर राज्यात ५० टक्के रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
अहवालानुसार, राज्यातील एकूण रुग्णसंख्येपैकी केवळ एक टक्का रुग्ण गंभीर असून पाच टक्के रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण व संचालनालय विभागाच्या माध्यमातून राज्यातील कोरोनाच्या सांख्यिक माहितीचा विश्लेषणात्मक अहवाल तयार करण्यात येतो. या अहवालानुसार, राज्यात रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी ८६ टक्के रुग्ण लक्षणविरहित, ११ टक्के रुग्णांना लक्षणे आहेत. तर ३ टक्के रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत. राज्यात १ लाख ३२ हजार रुग्णसंख्येत ६२ टक्के पुरुष तर ३८ टक्के महिला आहेत. राज्यात कोरोनाचे सहा हजारांहून अधिक बळी गेले आहेत. या मृत्यू झालेल्यांमध्ये ६५ टक्के पुरुष व ३५ टक्के महिला आहेत.
4500 बालकांना कोरोना
सध्या राज्यात १ लाख ३० हजारांहून अधिक कोरोनाच्या रुग्णांची नोंद आहे. त्यापैकी, दहा वर्षांखालील 4525 बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एकूण रुग्णसंख्येत या रुग्णांचे प्रमाण ३.५४ टक्के एवढे आहे. तर
११ ते २० वयोगटांतील 8348मुला- मुलींनाही कोरोना झाला आहे. या रुग्णांचे प्रमाण ६.५३% इतके आहे.
>प्रयोगशाळांची संख्या १०३
राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोग शाळांची संख्या १०३ एवढी झाली असून त्यामध्ये ६० शासकीय तर ४३ खासगी प्रयोगशाळा आहेत.
२६ मे ते २० जून या कालावधीत प्रयोगशाळांच्या संख्येत ३० ने वाढ झाली असून प्रति दशलक्ष चाचण्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. असे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
>राज्यात सर्वाधिक रुग्ण
३१ ते ४० वयोगट
२५ हजारांहून अधिक
२१ ते ३० वयोगट
२४ हजार रुग्ण आहेत.
४१ ते ५० वयोगट
२३ हजार रुग्ण
५१ ते ६० वयोगट
२२ हजार रुग्ण आहेत.
७१ ते ८० वयोगट
५ हजार रुग्ण
>७८१ रुग्णांची कोरोनावर मात
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अगदीच झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण गेल्या दहा दिवसांत वाढ झाली आहे. दहा दिवसांत ७८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे़
सरासरी ७८ रुग्ण दररोज बरे होऊन घरी जात आहे़ सद्यस्थितीत सर्वच तालुक्यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक असून ही बाब जिल्ह्यासाठी दिलासा देणारी मानली जात आहे़