Coronavirus: धनंजय मुंडे फायटर, ते लवकर बरे होतील; ब्रीच कँडीमध्ये उपचार; राजेश टोपेंकडून तब्येतीची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 06:15 PM2020-06-12T18:15:01+5:302020-06-12T18:17:41+5:30
Dhananjay Munde Coronavirus: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडेंच्या प्रकृतीविषयी माहिती देऊन, काळजीचं कारण नसल्याचं स्पष्ट केलंय.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे नेते धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. बीडहून मुंबईत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि बीडमधील धनंजय मुंडे समर्थक थोडे काळजीत आहेत. परंतु, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंडेंच्या प्रकृतीविषयी माहिती देऊन, काळजीचं कारण नसल्याचं स्पष्ट केलंय.
धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर आहे. कोरोनाचं कुठलंही लक्षण त्यांच्यात नाही. फक्त, श्वसनाचा किंचित त्रास जाणवत असल्यानं त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. धनंजय मुंडेंच्या कोरोना चाचणीचा एक रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आमचं बोलणं झालं. ते फायटर आहेत आणि लवकरच बरे होऊन पुन्हा सक्रिय होतील, असा विश्वासही टोपेंनी व्यक्त केला.
सर्व मंत्री, नेते सुरक्षित
धनंजय मुंडे यांचा मुंबईतील चालक, बीडचा स्वयंपाकी, वाहनचालक अशा ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मुंडेंच्या संपर्कातील व्यक्तींनाही क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आलाय. धनंजय मुंडे मंत्रिमंडळाच्या बैठकीला आणि पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातही उपस्थित असल्यानं, अन्य मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही चाचणी होणार का, अशी शंका निर्माण झालीय. मात्र, कुणामध्येही कोरोनाची लक्षणं जाणवलेली नसल्याचं राजेश टोपेंनी नमूद केलं. अजित पवारांच्या शिस्तीप्रमाणे आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळतो, मंत्रिमंडळ बैठकीतही योग्य अंतर राखलं जातं. त्यामुळे इतरांच्या चाचणीचा प्रश्न येत नाही, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, धनंजय मुंडे हे कोरोनाची लागण झालेले तिसरे मंत्री आहेत. याआधी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना कोरोना झाला होता. त्यांनी या आजारावर यशस्वीपणे मात केली आहे.
संबंधित बातम्याः
धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण; पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
बीडच्या पालकमंत्र्यांना ‘कोरोना’; आमदार, अधिकारी ‘क्वारंटाईन’
पंकजाताईंचं तिकीट कापलं, तेव्हा ‘धनुभाऊं’ना काय वाटलं?... ऐका त्यांच्याचकडून