CoronaVirus News : पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी शैक्षणिक दिनदर्शिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 05:08 AM2020-06-21T05:08:11+5:302020-06-21T06:17:11+5:30

CoronaVirus News : दहावीच्या अभ्यासक्रमांचा विषयनिहाय समावेश असून शिक्षक आणि पालकांनी कशी मदत करायची? त्यांना मार्गदर्शन कसे करावे, याच्याही सूचना आहेत.

CoronaVirus News : Educational Calendar for 1st to 10th | CoronaVirus News : पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी शैक्षणिक दिनदर्शिका

CoronaVirus News : पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी शैक्षणिक दिनदर्शिका

Next

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार, विद्यार्थ्यांना आणखी काही महिने प्रत्यक्ष शाळेत बोलावले जाणार नाही. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून डिजिटल र्लनिंगसाठी विभागाने सूचना जाहीर केल्या आहेत. या काळात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार व पालकांच्या मदतीने स्वयंअध्ययन कसे करावे, यासाठी शैक्षणिक दिनदर्शिकाही तयार केली आहे.
यात प्रत्येक इयत्तेनुसार जून, जुलै, आॅगस्ट या महिन्यांत विषयनिहाय धड्यांचे अध्ययन मुलांनी कसे करावे, याचे मार्गदर्शन केले आहे. यात पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमांचा विषयनिहाय समावेश असून शिक्षक आणि पालकांनी कशी मदत करायची? त्यांना मार्गदर्शन कसे करावे, याच्याही सूचना आहेत.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून  या दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. या दिनदर्शिकेत मुलांनी प्रत्येक धडा वाचून झाल्यावर काय कृती करावी? पालकांशी संवादाच्या माध्यमातून त्याची उजळणी कशी करावी? कोणता स्वाध्याय करावा? किती तास एखादा पाठ व त्याचा अभ्यास करावा? किती गणिते कोणत्या पद्धतीने सोडवावीत, याचे नियोजन देण्यात आले आहे. त्यामुळे याचा वापर करून विद्यार्थी आणि शिक्षक स्वत:च्या वेळेनुसार व सवडीनुसार शिक्षण घेऊ शकतील. यातील स्वयंअध्ययनपूरक साहित्य, कृती, स्वाध्याय यांचा वापर करून पालक, विद्यार्थी व शिक्षक पुढील काही महिने शाळा सुरू होईपर्यंत शिक्षण प्रक्रिया सुरू ठेवतील, असा विश्वास एससीईआरटीचे संचालक दिनकर पाटील यांनी व्यक्त केला.
शिक्षकांनी फोन कॉल्स, व्हॉट्सअ‍ॅप, व्हिडीओंच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी कनेक्ट राहून त्यांचे शिक्षण आनंददायी होईल, याचा प्रयत्न करण्याच्या सूचनाही या दिनदर्शिकेत आहेत. विद्यार्थ्यांवर आॅनलाइन चाचण्यांचा मारा न करता त्यांच्याशी चर्चा करणे, प्रश्न विचारणे, शंकानिरसन करणे व सर्वंकष मूल्यमापन करणे महत्त्वाचे असल्याचे यात नमूद आहे.

शिक्षकांसाठी सूचना
दिनदर्शिका कशी वापरावी? यासंबंधी पालक, विद्यार्थ्यांना फोन, व्हॉट्सअ‍ॅप, ग्रुप कॉल किंवा अन्य माध्यमांतून संवाद साधून मार्गदर्शन करावे.
-विद्यार्थ्यांशी व्हर्च्युअल संवाद साधताना शिक्षकांनी केवळ आभासाबद्दल न बोलता अनौपचारिक संवाद साधण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून त्यांच्यातील नाते अधिक दृढ होईल.
- प्रत्येक विषयाचे, इयत्तेचे ई-साहित्य पाहण्यापूर्वी व पाहिल्यावर त्यासंबंधी मार्गदर्शन करावे.
- यातील अभ्यासाशिवाय इतर उपक्रम किंवा साहित्य शिक्षक हे विद्यार्थ्यांना पुरवू शकणार आहेत आणि त्यातून त्यांचे अध्ययन घेऊ शकतील.

विद्यार्थी, पालकांसाठी सूचना
- ही दिनदर्शिका म्हणजे पुस्तकातील धड्यांचे नियोजन असून त्यासाठी पाठ्यपुस्तकांचा उपयोग करायचा आहे.
- धडा वाचून झाल्यावर किंवा ई-साहित्य पाहिल्यावर त्यात शंका असल्यास घरातील मंडळींशी संवाद साधावा. त्यांच्याकडून समस्येची उकल करण्याचा प्रयत्न करावा.
- दररोज प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्याची सवय लावून घ्यावी आणि नंतर शिक्षकांनी दिलेल्या चाचण्याही सोडवाव्या.
- पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांनी दिनदर्शिका, ई-साहित्य, दीक्षा अ‍ॅपचा वापर घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मदतीनेच करावा.
- प्रत्येक विषयाचा अभ्यास झाल्यावर गॅझेटपासून थोडी विश्रांती घेऊन नंतर दुसरा विषय घ्यावा. सतत वापर टाळावा.

Web Title: CoronaVirus News : Educational Calendar for 1st to 10th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.